जमीन हडपणार्‍या सिंडिकेटचा पर्दाफाश

इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील तळेगाव शिवारातील कोट्यवधी रुपये किमतीच्या रिसॉर्टची जमीन हडप करण्यासाठी संघटित टोळी सक्रिय आहे. या घटनेतील संशयित मिलिंद रामभाऊ कांबळे, संदीप जगताप, धीरज निकम (रा. नाशिक), अ‍ॅड. शेख (रा. नाशिकरोड) यांच्या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात बनावटगिरी व ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी पूजा संजीव करंबेळकर (वय 38, रा. कॅमल व्हॅली रिसॉर्ट, इगतपुरी) यांच्या तक्रारीवरून संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा इगतपुरी पोलीस यांनी सखोल चौकशीअंति तळेगाव (इगतपुरी) येथील कोट्यवधी रुपये किमतीची रिसॉर्टची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार्‍या एका संघटित सिंडिकेटविरुद्ध तपास सुरू केला आहे. हे संशयित आरोपी विविध त्रयस्थ व्यक्तींना जमिनीचे खोटे मालकी हक्क दाखवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकांना लुबाडण्याचे काम करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. या सततच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे अनेक जमिनीचे मूळमालक त्रस्त असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादी पूजा करंबेळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा तपास करून संशयित टोळीवर मोक्का कायद्यांंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारदारानी पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) व अप्पर पोलीस उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर यांच्याकडे केली आहे. हा संपूर्ण तपास 22 डिसेंबर 2022 रोजीच्या एका बनावट सामंजस्य करारावर केंद्रित आहे. विशेष म्हणजे, हा करार ज्या नोटरीने प्रमाणित केला आहे, या टोळीतील संशयितांवर यापूर्वीच देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 19/2022 जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तक्रारदारांनी या कराराच्या वेळी आपण नाशिकमध्ये नसून मुंबईत आणि त्यांचे वडील दापोलीत असल्याचे भक्कम पुरावे दिले आहेत. यामुळे संशयितांनी केलेला नाशिकमधील व्यवहाराचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सिद्ध होत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी व पोलीस पथक करीत आहे.

Land grabbing syndicate exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *