सर्जा-राजाचा साज खरेदीसाठी शेतकर्यांची गर्दी; साहित्यात 10 टक्के दरवाढ
लासलगाव : वार्ताहर
बळीराजासमवेत कायम शेतात राबणार्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा.हा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पिठोरी अमावस्येला म्हणजे 22 ऑगस्टला बैलपोळा हा सण आहे. यानिमित्ताने बैलांना ऐटीत सजवण्यासाठी लागणार्या साहित्यांनी लासलगावची बाजारपेठ सजली आहे. बाजारातील विविध आकर्षक वाटणार्या वस्तूंची खरेदीसाठी शेतकर्यांची दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
शिंगे झुली, शिंगांना रंगवण्यासाठी रंग, रंगीबेरंगी गोंडे, घुंगराची चंचाळे, बाशिंग, पितळी शेंबी, मोरक्या, कासरे, माटोट्या, कमरपट्टा यांसह बैलपोळ्याकरिता विविध आकर्षक साहित्य हे लासलगाव शहरातील दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 15 टक्के साहित्यदरात वाढ झालेली पाहायला मिळते. यंदा लासलगावसह परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा व चार्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शेतकरी राजा या बैलपोळा सणासाठी मोठ्या आनंदाने व ताकदीने सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळते. शहरातील दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी शेतकरी राजाची लगबग पाहायला मिळत असल्याचे दुकानदार सांगत आहेत.
यंदा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात सर्जा-राजाला सजविण्यासाठी
लागणारे साहित्य भरले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महागाईमुळे 10 ते 15 टक्के साहित्य दरात वाढ झालेली आहे. मात्र, असे असले, तरीही बळीराजासमवेत कायम शेतात राबणार्या लाडक्या सर्जा-राजाला पोळ्यानिमित्त ऐटीत सजवण्यासाठी लागणार्या साहित्याची शेतकरी हौशीने खरेदी करत आहेत.
-अनिल ठोके, दुकानदार, लासलगाव