लासलगावला मॉन्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी 

लासलगावला  पावसाची जोरदार हजेरी

लासलगाव : समीर पठाण

लासलगाव येथे आज मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह वादळी वारा व गारांच्या मॉन्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.लासलगाव शहर व परिसरातील गावांना या मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले.सुमारे दीड तासभर झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला तसेच या पावसामुळे शेतात नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लासलगाव शहराचा तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांपर्यंत गेला होता त्यामुळे उष्णतेने लासलगावकर भलतेच हैराण झाले होते.मात्र आज मंगळवारी  पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेने व्याकुळ झालेल्या लासलगावकरांना मोठा दिलासा मिळाला
दुपारी ४ च्या सुमारास वादळी वारा,विजांचा कडकडाटसह गारांच्या पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि जोरदार पावसाने एक तास झोडपून काढले.
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान शेतात उघड्यावर नुकताच काढून ठेवलेला कांदा या पावसाने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच कांद्याला भाव नाही त्यात कांदा भिजून खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पावसाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे तसेच सध्या लग्नसराई सुरू असून ग्रामीण भागात विवाह सोहळे दणक्यात साजरे होत असताना पावसाने अचानक हजेरी लावल्याने लग्न सोहळ्यात विघ्न आल्यामुळे वऱ्हाडी मंडळींची देखील तारांबळ उडाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *