गहू, हरभरा पिकांना फायदा; द्राक्ष उत्पादकांमध्ये वाढणार चिंता
लासलगाव : वार्ताहर
उत्तरेकडून येणार्या शीतलहरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून लासलगाव व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात मंगळवारी रात्री झालेल्या नोंदीनुसार निफाड तालुक्यातील थंडीचा सरासरी पारा 9.6 अंशांवर तसेच
लासलगाव शहराचा थंडीचा सरासरी पारादेखील 10.5 अंशांवर स्थिरावला आहे. या थंडीमुळे लासलगावकर भलतेच गारठले आहे.
वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बीच्या पिकांना फायदा होणार असला, तरी द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढणार आहे.सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा अन् दिवसभर गार वार्यांची झुळूक यामुळे सायंकाळच्या थंडीने बोचरे रूप धारण केल्याचे जाणवायला लागले आहे. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
वाढत्या थंडीने जनजीवनावर परिणाम जाणवू लागला आहे.हवेतील गारठा वाढत चालला आहे. पहाटेसह सायंकाळनंतर थंडी अधिक जाणवत आहे. यामुळे रात्री असणारी रस्त्यावरील लोकांची वर्दळ तुलनेने कमी जाणवत आहे. येणार्या काळात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. वाढत्या थंडीने जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.उबदार कपड्यांसह अनेक जण घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहे.राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे.अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे आणि हवामान थंड झाले आहे. यामुळे पहाटे धुक्याचे प्रमाण वाढले आहे आणि हवेत दव पडत आहे. येणार्या काळात थंडीचा असाच जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
उत्पादन खर्चात वाढ
निफाड तालुक्यात द्राक्षबागांचा हंगाम तोंडावर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सध्याचे हवामान द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढविणारे आहे. या हवामानात भुरीचाही प्रादुर्भाव वाढणार असल्याने बुरशीनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.वाढलेली थंडी रब्बी हंगामासाठी पोषक मानली जात असली, तरी द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांना पोषक
वातावरणात गारठा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होणार आहे. यात प्रामुख्याने गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. सुरुवातीपासूनची थंडी या पिकांना पोषक ठरून थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास उत्पादनात वाढीची आशा आहे.
सद्यःस्थितीत असलेले तापमान रब्बी पिकांसाठी फायद्याचे आहे.
उबदार कपड्यांना मागणी
लासलगाव व परिसरात तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. दिवसभर थंडी जाणवत असून, नागरिक अंगात स्वेटर परिधान करत आहे. वाढलेल्या थंडीमुळे लासलगाव शहरातील दुकानदारांकडे कानटोपी, स्वेटर, जॅकेट, हातमोजे यांची मागणी अधिक वाढली आहे.