लासलगांव बाजार आवारांवर उद्या कांदा लिलाव 

लासलगांव बाजार आवारांवर उद्यापासुन कांदा लिलाव

लासलगांव: प्रतिनिधी

केंद्र शासनाने 40 टक्के निर्यात शुल्क लागु केल्याने नाशिक जिल्ह्यासह लासलगांव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव उद्यापासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांदा दरावर नियंत्रण ठेवणेसाठी भारतातुन होणाऱ्या कांदा निर्यातीवर दि. 19 ऑगस्ट, 2023 पासुन ४० टक्के निर्यात शुल्क लागु केले होते. त्यामुळे कांदा बाजारभावात घसरण होण्याची शक्यता असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी वर्गाने दि. 21 ऑगस्ट, 2023 पासुन कांदा खरेदी व विक्रीचे कामकाज बेमुदत बंद केलेले आहे.

परंतू बाजार समितीच्या निफाड व विंचुर उपबाजार आवारावर कांदा खरेदी व विक्रीचे कामकाज सुरू झालेले असल्याने लासलगांव मुख्य बाजार आवारावर देखील कांदा खरेदी व विक्रीचे कामकाज सुरू करावे यासाठी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयात बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी वर्गाची संयुक्त बैठक आयोजित केली होती.त्यानुसार सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार व्यापारी वर्गाने उद्या गुरूवार, दि. 24 ऑगस्ट, 2023 पासुन कांदा लिलावाचे कामकाजात सहभागी होणेस संमती दर्शविल्याने बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर उद्या गुरूवार, दि. 24 ऑगस्ट, 2023 पासुन कांदा लिलावाचे कामकाज पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

सदर बैठकीस बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे,सदस्य बाळासाहेब दराडे,प्रविण कदम,रमेश पालवे,सचिव नरेंद्र वाढवणे,कांदा व्यापारी नितीनकुमार जैन,ओमप्रकाश राका,मनोजकुमार जैन,अमर ब्रम्हेचा, विवेक चोथाणी,निलेश सालकाडे,आनंदा गिते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *