लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगाव:-समीर पठाण

केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर आज गुरुवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले.यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने शिवसेनेचे शिवा सुरासे,बाळासाहेब जगताप,संतोष पानगव्हाणे,अभिजित डुकरे तसेच छावा क्रांतिकारी संघटनेचे गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपयांनी घसरले आहेत.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून झालेला तोटा भरून निघण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या वेळी शिवा सुरासे यांनी केली तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास या पुढे रस्ता रोको,रेल रोको या सह जेल भरो सारखे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवा सुरासे यांनी या वेळी दिला.साधारण अर्धा तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरु करण्यात आले. आज गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली.कांद्याला जास्तीत जास्त २५०१ रुपये,कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी २७०० रुपये भाव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *