श्री गणेश जयंती अर्थात, ’माघी गणेश जयंती’ आज (दि. 22 जानेवारी) आहे. आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया. या दिवशी सर्वांत प्रथम श्रीगणेश तत्त्वाच्या लहरी पृथ्वीवर आल्या. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी श्रीगणेशाचे तत्त्व अन्य दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने पृथ्वीवर येत असते. त्यामुळे आपण जर गणपतीची कोणत्याही प्रकारे उपासना केली तर आपल्याला गणपतीच्या कृपेचा एक हजार पटीने लाभ होतो. त्यामुळे या दिवशी आपण प्रातःसमयीपासून
रात्रीपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा श्रीगणेशाचा नामजप करणे, गणपतीची भावपूर्ण पूजा, आरती करणे, गणपतीला लाल फूल व दूर्वा वाहणे याप्रकारे उपासना करू शकतो आणि गणेश तत्त्व ग्रहण करण्याचा प्रयत्न करू शकतो. गणपतीचा ’ॐ गं गणपतये नमः’ किंवा ’श्री गणेशाय नमः’ हा नामजप करू शकतो. गणपती अथर्वशीर्ष म्हणणेसुद्धा पुष्कळ लाभदायक आहे. अथर्वशीर्षाची फलश्रुती वाचल्यानंतर या स्तोत्राचे प्रचंड सामर्थ्य लक्षात येईल. बुद्धिदाता, विघ्नहर्ता श्रीगणेशाला शरण जाऊन प्रार्थना करूया की, त्याने आम्हाला कायम सुबुद्धी देवो, आमची विवेकबुद्धी कायम जागृत राहो आणि आमच्याकडून त्याला अपेक्षित असे कार्य घडो.
– आदिती देखणे, पनवेल