स्व. डॉ. वसंतराव नगरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नाशिकरोडच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, तसेच ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सर्वांशी जोडले
गेलेले, समरस झालेले डॉ. वसंतराव रुद्राप्पा नगरकर 77 व्या वर्षी शिवैक्य झाले. आता उरल्या फक्त त्यांच्या आठवणी. त्यांच्या स्मृतींना, कार्याला
उजाळा देण्याचा हा प्रयत्न…
वसंतराव नगरकर बिझनेस बँक, व्यापारी बँक, ऋतुरंग परिवार व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या भरीव कार्याने सर्वांच्या स्मरणात राहिले. पण त्यापूर्वीचा काळही त्यांच्या हरहुन्नरी स्वभावाने, वक्तृत्व, कर्तृत्वाने सर्वांना पथदर्शक ठरेल असाच आहे. ते अतिशय संयमी होते. मित्र किंवा सहकारी यास त्याच्या गुणदोषासह स्वीकारायचे, हा त्यांचा फार मोठा गुण होता. इंग्रजी माध्यमाच्या सेंट फिलोमिना शाळेत अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर वडिलांच्या ट्रान्स्पोर्ट व्यवसायात ते रमले होते. जे करायचे, त्या कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणे, त्यातील अडीअडचणी समजून घेत त्या दूर करणे, व्यवसायाची भरभराट करणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. मुंबईला भाजीपाला व इतरही माल ’उपकार’ या त्यांच्या ट्रकमधून वेळेवर पोहोचविणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामीण भागात त्यांचा दांडगा परिचय होता.
डॉ. वसंतरावांनी नाशिक जिल्हा मोटार मालक अँड ट्रान्स्पोर्ट एजंट असोसिएशनची स्थापना केली. जयवंतराव बोडके अध्यक्ष, तर वसंतराव नगरकर सरचिटणीस होते. जकात बंद करण्यासाठी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन दिवसांचा संप करून जकात बंद करून प्रोफेशनल टॅक्स सुरू करण्यास सरकारला भाग पाडले. शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईत भाजीपाल्यावरील कर भरण्यासाठी चालकाला वाशी मार्केटला जावे लागे. तो कर नाक्यावरच घ्यावा, ही मागणी शरद पवारांकडून मंजूर करून घेतली. बोडके व नगरकरांची ट्रान्स्पोर्ट वाहतूक व्यवसायातील जोडी सहा वर्षे असोसिएशनच्या कामात उत्तमरीत्या कार्यरत होती.
भूतपूर्व नाशिकरोड-देवळाली नगरपालिकेत आप्पासाहेब अरिंगळे यांनी तरुण युवकांना नगरसेवकपदासाठी उभे केले. त्यात वसंतराव नगरकर गोसावीवाडी या मुस्लिमबहुल वॉर्डातून विजयी झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजाचाच तगडा उमेदवार उभा होता. तरीही केवळ वसंतरावांच्या स्वभावामुळे व सर्वांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे मुस्लिम बांधव वसंतराव यांच्या मागे उभे राहिले, हे विशेष! नगरपालिकेत त्यांनी बांधकाम सभापतिपदाची धुरा सांभाळली. स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई या संस्थेवर नगरपालिका गटातून वसंतराव निवडून गेले. तब्बल सात वर्षे ते या पदावर होते. त्यांच्या काळात अग्निशमन दलाची इमारत व नगरपालिका जवाहर मार्केट इमारतीचा दुसरा मजला उभारला गेला. नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेवरही वसंतराव वीस वर्षे संचालक व उपाध्यक्ष राहिले. यावेळी उत्तमशेठ चोरडिया, विजय संकलेचा, श्रीनिवास लोया आणि वसंतराव नगरकर यांची बँकेत चर्चा झाली. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळेत मराठी मुलांना प्रवेश मिळत नाही म्हणून ’सरस्वतीची पूजा मेणबत्तीने करण्याऐवजी अगरबत्तीने करावी’ ही संकल्पना मांडण्यात आली. ती वसंतराव, विजय संकलेचा यांनी उचलून धरली आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या संस्थेवर ते 15 वर्षे सेक्रेटरी पदावर कार्यरत राहिले. आज या संस्थेच्या शाळा, कॉलेजमधून पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोनशेच्या वर स्टाफ येथे कार्यरत आहे. सध्या व्हाइस चेअरमन त्र्यंबकराव गायकवाड, सेक्रेटरी विजय चोरडिया, सहसेक्रेटरी विजय संकलेचा हे या संस्थेची धुरा सांभाळत आहेत.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेतून बाहेर पडल्यावर वसंतरावांनी जिद्दीने ’नगरकर गुरुकुल’ ही शैक्षणिक संस्था उभी केली. ती पुढे भा. वि. जोशींच्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळास जोडली. आज प्रवीण जोशी व सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत आहे. विंध्य पेपर मिलमधून निवृत्त झालेले उद्योजक के. जी. गुप्ता यांना ’गोल्डन होरायझन’ ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी वसंतरावांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. बिझनेस को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना विजय संकलेचा, वसंतराव नगरकर आदींनी केली. पण प्रथम चेअरमन वसंतरावांनी आपले धाकटे बंधू अ‍ॅड. सिद्धेश्वर नगरकर यांना केले. प्रथमपासूनच बँकेत संगणक प्रणालीचा वापर करून बँक अत्याधुनिक व कॉर्पोरेट दर्जाची बनवली. बँकेच्या आज पाच शाखा असून, 20 संचालक व 100 स्टाफ कार्यरत आहे. आज बिझनेस बँक जिल्ह्यात नावाजलेली बँक आहे. त्या बँकेवर वसंतरावांनी अखेरपर्यंत विविध पदांवर कार्यरत राहत बँकेचा उत्कर्ष साधला आहे. वसंतराव नगरकरांचे 43 वर्षांपासूनचे बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय व्यवस्थापन कार्य व बँकिंग कामकाजाबद्दल अमेरिकेच्या वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीतर्फे ’डॉक्टरेट’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे.
नाशिकरोडकरांची सांस्कृतिक कार्यक्रमांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी विजय संकलेचा व वसंतराव नगरकरांनी बिझनेस बँकेचे अपत्य म्हणून ’ऋतुरंग परिवाराची’ स्थापना केली. आज तब्बल 26 वर्षे हा परिवार नागरिकांची निर्भेळ करमणूक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांना आणून करत आहे. शास्त्रीय गायनाची परंपराही ऋतुरंग परिवाराने जोपासलेली आहे.
वसंतराव महाराष्ट्र वीरशैव सभा, पुणे या संघटनेवरही अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तीन वर्षांत त्यांनी ’वीरशैव लिंगायत जोडो’ अभियानासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढत समाजसंघटन केले. त्यांच्या समवेत बद्रिनाथ वाळेकर (खजिनदार), अरुण मिटकरी (सेक्रेटरी) असत. त्यामुळे हा समाज संघटित झाला. आज लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचे स्वरूप द्या, अशी मागणी करू लागला आहे. देवळालीगाव तरुण वीरशैव समाज संघटनेलाही त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
नंदकिशोर नगरकर या संघटनेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. यापूर्वी नाना नगरकर, अ‍ॅड. बी. बी. दंदणे, संजय फोलाणे यांनीही या संघटनेवर काम केलेे आहे. वडांगळी येथील लिंगायत समाजाच्या मठाला शिवाचार्य बसविण्याचा मोठा सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. वसंतरावांनी सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था तसेच वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थाही काढल्या. वसंतरावांनी बद्रीनाथ वाळेकरांच्या सहकार्याने समाजप्रबोधनासाठी ’वीरशैव अमृतधारा’ मासिक विनामूल्य बारा वर्षे चालविले. आज या वीरशैव नागरी पतसंस्थेवर चेअरमन वैभव वाळेकर व व्हाइस चेअरमन नंदकिशोर नगरकर कार्यरत आहेत.
वसंतरावांनी समाजकार्य करताना गृहप्रपंचाकडेही जातीने लक्ष दिले. त्यांना त्यांच्या पत्नी विजयाताईंची उत्तम साथ मिळाली. मुलगा कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर 14 वर्षे शिक्षणासाठी बाहेर होते. त्यांच्या शिक्षणासाठी तत्कालीन खासदार वसंतराव पवारांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे, डॉ. राज नगरकरांनीही त्यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या वडिलांच्या जन्मदिनी करून कृतज्ञता जोपासली.
तत्कालीन खासदार डॉ. वसंत पवारांकडून वसंतराव नगरकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकपदाचे तिकीट निश्चित होते. पण त्यांनी स्वतःची संधी नाकारून मुलगा रणजित यास पुढे चाल दिली व तो शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक झाला. स्थायी समितीचा सभापतीही झाला. तिसरा मुलगा समीर यालाही व्यवसायात स्थिर केले आहे. परिवारातील सर्वच उच्चविद्याविभूषित आहेत, हे वसंतरावांचे मोठे योगदान आहे.

Late Dr. Vasantrao Nagarkar: A multi-faceted personality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *