*प्रकृतीचा नियम – परिवर्तन
*डॉ. संजय धुर्जड.
अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांना बौद्धत्व प्राप्त झाले होते. जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी तपश्चर्या केली. दुःखाचे कारण शोधून त्याच्यातून स्वतःला मोक्ष प्राप्ती कशी करता येईल, याचा मार्ग मानव जातीला दाखवून दिला. त्याच सोबत, त्यांनी प्रकृतीचा एक बहुमोल सिद्धांत अनुभवला आणि तो जगाला दिला. हे जग आणि ही सृष्टी अस्थिर आहे, यातील सर्वच गोष्टी क्षणभंगुर आहेत. या सृष्टीत कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी असू शकत नाही. ती केव्हा न केव्हा संपणार किव्हा बदलणार आहे. म्हणजेच परिवर्तन होणार हे निश्चित असते. परिवर्तनाचा प्रतिकार करू नये. ते अटळ आहे. तसेच, जीवनाच्या (देहाच्या) आणि जगातील भौतिक वस्तूंच्या अतिप्रेमात पडलो तर, अपेक्षाभंग होणार आणि त्यातून दुःख निर्माण होणार, हे सिद्धांत आणि तत्वज्ञान भगवान गौतम बुद्धांची या जगाला देन आहे. याहीपेक्षा अनेक विषयांतील नियम आणि ज्ञान दिले आहे.
आज आपण परिवर्तन या तत्वाबद्दल बोलूया. आधीच सांगितल्याप्रमाणे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि ते अटळ आहे. हे मी नवीन काही सांगत नाहीए, तुम्हाला मला आणि सर्वांनाच हे माहीत आहे. परंतु, आपण जीवन जगतांना आणि व्यवहारात वागतांना खूप सोयीस्करपणे हे विसरतो. यश मिळाले की कायमच यशस्वी होऊ आणि तसेच राहू असे आपल्याला वाटते. असे तुमच्या आसपास शेकडो उदाहरणे तुम्ही बघितले असतील. एकदा का पैसा आला, किव्हा यश मिळालं की माणूस बदलतो. त्याला गर्व चढतो, उतमात करतो, वाट्टेल तसा वागतो. पण ते यश नेहमीसाठी टिकून राहील याची शाश्वती नसते. तसेच, एखाद्या कामात अपयश आले, तर आपण निराश होतो, पुरता खचून जातो, उमेद संपते, आत्मविश्वास गमावतो. इथेही लक्षात ठेवलं पाहिजे की ही स्थितीसुद्धा कायम राहणार नाही, ती बदलणार. परिवर्तन होणार. त्यासाठी केवळ विचारपूर्वक कार्य करणे, श्रम घेणे, कष्ट करणे हे महत्वाचे आहे. तुम्हाला यश मिळणारच हो, आणि ते टिकून ठेवण्यासाठीही प्रयत्न केलेच पाहिजे.
नुकतेच आपल्याकडे मराठा विद्याप्रसारक समाजाची पंचवार्षिक निवडणूक झाली. तिथेही परिवर्तन झालेच. ३५ वर्षे एकठिकानी सत्ता असूनही यावेळी सत्तापालट झाली. आधीचे वाईट आणि नवीन येणारे खूप चांगले आहेत असेही नाही. दोन्हींच्या उजव्या डाव्या बाजू आहेत. जुन्या कार्यकारिणीने नकारात्मक विचार न करता, समाजाच्या आणि संस्थेच्या हितासाठी कार्य सुरू ठेवावे, तसेच नवनिर्वाचित कार्यकरिणीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी मिळालेला आहे. विजयाने हुरळून न जाता जोमाने काम करून स्वतःची पात्रता सिद्ध करावी. हे यश चिरंतर नसून पाच वर्षांच्या मुदतीसाठी संस्थेच्या सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवत बहुमत दिले. लोकशाहीचा पाया समजल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतून आपली निवड झालेली आहे. जसे निवडून दिले तसे घरीही पाठवू शकते हे राज्यकर्त्यांनी विसरू नये. मग ती संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्था, बँक असो की पतसंस्था, विधानसभा असो की लोकसभा सगळीकडे एकच नियम.
अरे हो, विधानसभा आणि लोकसभेवरून आठवलं. आज महाराष्ट्रात आणि देशात जे सुरू आहे, त्या राज्यकर्त्यांना परिवर्तनाच्या नियमाची आठवण करून देणे आवश्यक आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून घडामोडींवरून असं वाटतं की राज्यकर्त्यांना नक्कीच याचा विसर पडलेला दिसतो. तिथेही जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून पाच वर्षांसाठी राज्याचा कारभार बघण्यासाठी आणि जनतेच्या हिताचे कामं करण्यासाठी आपल्याला निवडून दिलेले आहे, हे सर्वच जण सोयीस्कररित्या विसरलेले आहेत. परिवर्तन होणार हे त्यांना कदाचित माहीत नसावं, म्हणून ते असे वागत आहे. परिवर्तनाचा सिद्धांत माहीत असेल आणि तरीही असे वागत आहे, याचा अर्थ असा की या नियमाला प्रतिकार करत आहे. म्हणजे, परिवर्तन होऊ नये यासाठी, आपणच टिकून राहावे यासाठी वेळ, श्रम आणि पैसा खर्च करत आहे. येन केन प्रकारे सत्ता मिळवायची, ती टिकवायची, विरोधकांचे खच्चीकरण करून त्यांना संपवायचे असा घाट घातला जातोय. हे करण्यात त्यांना यश येतही असेल, पण प्रकृतीच्या नियमांना चुकीचे ठरवू शकत नाही.
देश पातळीवर हेच चित्र बघायला मिळते आहे. सत्तेत मस्तमवाल होऊन कारभार केला जात आहे. महाराष्ट्र, बिहार, आणि इतर चार पाच राज्यांमध्ये स्थानिकांना संपवू पहात आपलेच शासन कसे असेल यावर खलबत केली जात आहे. इतरांचे पितळ उघडे करून, अथवा उघडे करण्याचा धाक दाखवून राज्य केले जात आहे. नियती, कर्म, धर्म, देव अशा विषयांवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षाने या गोष्टी कशा विसराव्या हेच नवल आहे. आपण इतरांना जशी वागणूक देऊ तशीच वागणूक आपल्यालाही मिळेल हे सांगणारी धर्मग्रंथ गीता कशी विसरू शकता. सत्तर वर्षांपैकी अधिकांश काळ राज्य केलेल्या पक्षाचे काय झाले हे त्यांना दिसू नाही का? आज त्यांची अशी दशा झाली आहे, उद्या आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते, हे त्यांना कसे न कळे? परिवर्तन होणार हे निश्चित, पण चांगल्या पद्धतीने, अर्थात नीती, नियम, तत्व, लज्जा राखून केलेले कर्म कामी येतात. जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला तिथे बसवले आहे, त्यास जागून तो विश्वास सार्थ ठरवावा. असे केल्याने किमान चांगले दिवस जास्त काळ टिकेल. प्रतिकूल परिस्थिती आलीच तर जास्त काळ टिकणार नाही, हेही लक्षात घ्यावे.
सर्वच दिवस सारखे नसतात, हे आपल्याला कोविड महामारीने, त्यापूर्वीच्या दोन्ही महायुद्धांनी दर्शवून दिले आहे. कालांतराने दिवस बदलतात, हे आपण सर्वांनी मागील अडीच वर्षांत अनुभवलेले आहे. ज्यांनी हिम्मत ठेवली, संयम ठेवला आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तो जगला. ज्याने त्या बिकट परिस्थितीचा प्रतिकार केला, अशी वेळ आली म्हणून निराश झाला, हताश झाला, घाबरला, खचला आणि लांब पळण्याचा प्रयत्न केला, त्याने जीव गमावला, हे आपण सर्वांनी बघितलं आणि अनुभवलं देखील. आज आपण त्या बिकट परिस्थितून बाहेर आलो आहोत, तर त्यातून काहीतरी शिकायला हवं, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपले आरोग्य राखले पाहिजे, मानसिक आणि शारीरिक भक्कमता वाढवली पाहिजे, वाईट सवयी बंद केल्या पाहिजे. स्वतःसाठी जगायला शिका, कुटुंबियांना वेळ द्या, आनंद द्या, नातेसंबंध सुधारावे, मैत्री वाढवावी, भौतिक वस्तूंमध्ये जीव अडकवू नये, समाजाभिमुख कार्य करावे (प्रामाणिकपणे), इतरांचा मान, सन्मान, आदर करावा, विश्वास ठेवावा, आणि सर्वांना सोबत घेऊन विधायक कार्य करावे आणि किर्तीरूपे मागे उरावे.
*डॉ. संजय धुर्जड.*
नाशिक.
9822457732