हिंदुत्व सोडल्याने सेनेची मते भाजपाला मिळणार : तावडे

नाशिक : प्रतिनिधी
राम मंदिराला विरोध करणार्‍या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सेनेने सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडील हिंदुत्ववादी मते संभ्रमित झाली आहे. यापूर्वी हिंदुत्वाची जी मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांमुळे होती, ही मते आता भारतीय जनता पक्षाकडे वळवण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे आमची मतदानाची टक्केवारी वाढणार असून, 45 ते 50 टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली.
भाजपाला स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची असून, या बैठकीत प्रामुख्याने राम मंदिराला विरोध करणार्‍या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची व गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मते भारतीय जनता पक्षाकडे वळविण्याबाबत विचारमंथन केले गेले. पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मताधिक्य 28 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर येण्याची रणनीती देखील निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी दिली. तावडे पुढे म्हणाले की, सन 2014 मध्ये सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला 28 टक्के मते पडली. शिवसेनेला 19 टक्के, कॉंग्रेसला 18 टक्के, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 17 टक्के मते पडली. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, शिवसेनेने सत्तेसाठी दोन्ही कॉंग्रेस सोबत गेल्याने त्यांची मते भाजपकडे येणार असल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *