दिंडोरी तालुक्यात दोन जणांवर बिबट्याचा हल्ला

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील इंदोरे व पिंपळणारे शिवारात बिबट्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला असून, वेगवेगळ्या घटनांत एक जण गंभीर झाला असून, जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील इंदोरे येथील शेतकरी
दत्तू काबू कोरडे यांच्यावर सकाळच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हात व पोटावर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर आरडाओरड केल्याने कसाबसा जीव वाचला. ही घटना इंदोरे येथील मळ्यात सकाळच्या सुमारास घडली. कोरडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. तर दुसरी घटना पिंपळणारे शिवारात सायंकाळी 6.30 वा. सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी नंदकिशोर गणपत बोराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी उपचार करून पुढील उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
परिसरातील ढकांबे, शिवनई, खतवड, पिंपळणारे, इंदोरे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून, पिंपळणारे व इंदोरे या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन शेतकर्‍यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिक धास्तावले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
दिंडोरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पूजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे यांच्यासह कर्मचारीवर्गाने घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान परिसरातील शेतकर्‍यांनी निर्जनस्थळी एकट्याने फिरू नये. सावधगिरी बाळगावी. वस्तीवरील पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावे जेणेकरून बिबट्याच्या हल्ल्यापासून बच्चाव होईल, असे आवाहन वनविभागाचे वनपाल अशोक काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *