दिंडोरी : वनविभागाने शिताफीने कामगिरी बजावत दिंडोरी येथील जाधव वस्तीवर सोमवारी (दि.1) पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी हालचाली केल्या. अखेर रात्रीच्या सुमारास बिबट्यास जेरबंद केले. मात्र, अद्यापही बिबट्याची दहशत थांबलेली नाही.
बिबट्याचा वावर संपता संपेनासा झाला असून, दिंडोरी तालुक्यात एकापाठोपाठ बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, वन विभाग उदासीन का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. बिबट्याने वनारवाडी येथील युवती, त्यानंतर पाच वर्षीय बालकाचा बळी घेतला. या घटनेनंतर संतप्त जनसमुदायाने काही काळ नाशिक-सापुतारा रास्ता रोको करून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी होती. त्यानंतर दिंडोरी येथील जाधव वस्तीवर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद केले. हा बिबट्या मादी असून, बालकाचा बळी घेणारा बिबट्या होता की मादी हे समजले नाही. त्यामुळे परिसरात अजूनही दहशत कायम आहे. यावेळी वन विभागाने पिंजर्यासहित बिबट्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी अशोक काळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जेरबंद बिबट्यावर उपचार सुरू असून, रविवारी रात्री श्याम जाधव यांच्या घराकडे दोन बिबटे महिलांना दिसून आले. त्यामुळ परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.