बिबट्याचा तरुणावर झेप घेण्याचा प्रयत्न; जीव वाचला

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जय भवानी रोड परिसरात थरारक घटना घडली. वृंदावन पार्क, लवटेनगर- 1 येथील इमारतीच्या पायर्‍या उतरत असताना अचानक समोर आलेल्या बिबट्याने एका तरुणावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. क्षणभर गोंधळलेला तरुण सावध झाला आणि झपाट्याने पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. आर्टिलरी सेंटरकडून आलेला हा बिबट्या जय भवानी रोडवरील जुन्या मथुरा मिठाई दुकानाजवळून पुढे येत वृंदावन अपार्टमेंटच्या पार्किंगमधून भिंतीच्या आडोशाने गेला. त्याचवेळी जितू वराडे पायर्‍या उतरून आपल्या वाहनाकडे जात असताना ते समोरासमोर आले. बिबट्याने झेप घेतली. मात्र, वराडे यांनी प्रसंगावधान राखत जोरात पळ काढल्याने हल्ला टळला. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी अ‍ॅड. नितीन पंडित तसेच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि बिबट्याच्या हालचालींची माहिती तत्काळ वन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लवटेनगर, साईश्रुत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिबट्या दिसला व एका तरुणावर हल्ला केला, पण तो बचावला. वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी आहे. पिंजर्‍यांची संख्या वाढवण्याची मागणी आहे. नागरिक दहशतीखाली आहेत. मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. दुुकानदार रात्री लवकर दुकाने बंद करत आहेत. लहान मुलांना सकाळी शाळेत सोडवताना पाल्य जीव मुठीत घेऊन जातात.
– अ‍ॅड. नितीन पंडित, शहर उपाध्यक्ष, मनसे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *