देवगावसह परिसरात पुन्हा बिबट्यांचा संचार

ग्रामस्थांत भीतीचे सावट; बावीस दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद

लासलगाव : वार्ताहर
देवगाव परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद होत आहे. गुरुवारी पहाटे येथील पोलीसपाटील सुनील बोचरे यांच्या गट क्रमांक 414/2 मधील पिंजर्‍यात अंदाजे पाच वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. बावीस दिवसांत हा तिसरा बिबट्या पकडला गेल्याने गावकर्‍यांत तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पिंजर्‍यात जोराची हालचाल झाल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्काळ वनविभागाला पाचारण केले. काही दिवसांपासून या भागात बिबट्यांची वाढती वर्दळ असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याआधी शरद जोशी यांच्या गट क्रमांक 485 मधील पिंजर्‍यात एक नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला होता. तसेच नंतर चांगदेव शिंदे यांच्या गट क्रमांक 191 मध्ये आणखी एक बिबट्या पकडला गेला होता.
कमी कालावधीत तीन बिबट्यांचा शिरकाव उघड झाल्याने स्थानिक नागरिकांच्या भीतीत मोठी भर पडली आहे. त्या घटनेनंतर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी देवगाव फाटा मार्गावर रास्ता रोको करत, ‘जिवंत पकडून जंगलात सोडले तर तो परत गावातच येतो,’ असा आरोप करत बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. त्यामुळे कालची नवी घटना पुन्हा चिंता वाढवणारी ठरली.
बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जनावरांवरील हल्ल्यांत वाढ, रात्री शेतात जाण्याचा धोका आणि सतत होणारी हालचाल यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे. जंगलात सोडलेले बिबटे पुन्हा गावातच परततात. आमची भीती संपतच नाही, अशी भावना गावकर्‍यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *