सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मिठसागरे येथे सोमवारी सायंकाळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.16) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची घटना समोर आली. या बिबट्याला पिंजऱ्यातून घेऊन जात असताना 200 मीटर अंतरावर पुन्हा बिबट्या दिसल्याने मिठसागरेकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पंचाळे आणि निमगाव देवपूर शिवारात हल्ला करून दोन बालकांना ठार मारणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे गेल्या 10 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. अशातच तालुक्याच्या पूर्व भागात गावोगावी बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पंचाळे, खडांगळी, निमगाव-देवपूर, मेंढी, धनगरवाडी परिसरात 9 पिंजरे लावलेले असताना, मिठसागरे परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मिठसागरे येथे उजनी रस्त्यावरील माजी पोलीसपाटील दिनकर चतुर यांना मक्याच्या शेतात सोमवारी बिबट्या दिसून आला होता. या परिसरात बिबट्याचे ठसेही दिसून आले होते. त्यामुळे रामदास लहानू चतुर यांच्या मक्याच्या शेतात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी पिंजरा लावला होता. समृद्धी महामार्गाच्या कडेला सायाळे येथे लावण्यात आलेला पिंजरा मिठसागरे येथे सोमवारी सायंकाळी आणण्यात आला होता.
सकाळी पिंजऱ्यातून डरकाळ्यांचा आवाज आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीसपाटील राजेंद्र चतुर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधून पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, नारायण वैद्य यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्या
ताब्यात घेतला.
दरम्यान, पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या घेऊन जात असतानाच शेजारच्या शेतात पिकअपमध्ये कोबी भरत असताना शेतकऱ्यांना दुसरा बिबट्या दिसला. जेरबंद झालेला बिबट्या नर असल्याने पुन्हा दिसलेला मादी बिबट्या असावा, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या परिसरात पुन्हा पिंजरा लावून दिसलेला बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.