फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करूया!

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला सणांचा राजा म्हटले जाते. कारण दिवाळी हा एकमेव असा सण आहे, जो पाच दिवस चालतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच आवडीचा हा सण आहे. या सणाचा उत्साह काही औरच असतो. या सणाइतका आनंद दुसर्‍या कोणत्याच सणात नसतो. दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा सण, प्रकाशाचा सण.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत पणत्या, मेणबत्त्या, आकाशकंदील, नवी खरेदी, नवे कपडे, मिठाई, रांगोळी, दिवाळी अंक, धार्मिक गोष्टी, मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांच्या भेटी, कौटुंबिक संमेलन आणि फटाके या सार्‍या गोष्टी आल्या. यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फटाके. फटाके आणि दिवाळी हे तर जणू समीकरणच झाले आहे. फटाक्यांशिवाय दिवाळीच साजरी होऊ शकत नाही अशी आजची अवस्था आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके उडवतात. वास्तविक दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. फटाक्यांचा नाही,
तरीही दिवाळीत फटाक्यांना अवास्तव महत्त्व दिले जाते. दरवर्षी दिवाळीत फटाके उडवू नका, फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांचा फटका केवळ मानवजातीलाच नव्हे, तर संपूर्ण सजीव सृष्टीला बसतो. त्यामुळे दिवाळीत फटाके उडवू नका. फटाके उडवायचेच असतील तर हरित फटाके उडवा, असे आव्हान सरकारतर्फे तसेच अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून केले जाते.
मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. अर्थात, काही लोक त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देतात. मात्र, त्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फटाक्यांचे समर्थन करणारे नेहमी म्हणत असतात की, दिवाळीतच फटाके न वाजवण्याचे आव्हान का केले जाते? याचे कारण असे आहे की, दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. दिवाळीइतके फटाके इतर कोणत्याही वेळी वाजवले जात नाहीत. अधिक फटाके वाजवल्याने त्याचे दुष्परिणामही अधिक होतात. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात त्यामुळे प्रदूषण वाढते.
आधीच आपल्या देशाची हवा प्रदूषित आहे. मुंबई-दिल्लीसारख्या शहरांच्या हवेने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यात जर फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडली तर लोकांना श्वास घेणेही मुश्कील होईल. तसे झाले तर त्याचा परिणाम केवळ मानवाच्याच नव्हे, तर संपूर्ण सजीव सृष्टीच्या आरोग्यावर होईल. कॉपर, कँडियम, लेड, गंधक, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, नायट्रेट आदी रसायनांपासून फटाक्यांची निर्मिती केली जाते. ही रसायने मानवी आरोग्याला घातक आहेत. फटाक्यातील कॉपरमुळे श्वसनमार्गात दाह होतो. त्यामुळे दम्याच्या रोगांच्या आजारात वाढ होते. हृदयविकार आणि फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते. लेड मज्जासंस्थेवर परिणाम करते. कँडियम मूत्रपिंडाचे नुकसान करते. सल्फर हे वनस्पतींसाठी घातक आहे.
सल्फरमुळे वनस्पतींची वाढ खुंटते. सल्फरमुळे झाडांच्या फळावर अनिष्ट परिणाम होतो. ही फळे खाण्यात आल्यास खाणार्‍यांना विषबाधा होण्याचा धोका असतो. फटाक्यांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाचा लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, तसेच रुग्णांना खूप त्रास होतो. सतत चार ते पाच दिवस कानठळ्या बसवणारा आवाज ऐकल्यावर कायमचे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. शिवाय फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली नाही, तर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. ऐन दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना किंवा कारखान्यांना आग लागून दुर्घटना घडल्याचे आणि त्यात जीवित व वित्तहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत हेदेखील विसरता येणार नाही.
या सर्व बाबींचा विचार केला तर फटाके किती घातक आहेत, हे लक्षात येईल. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. मानवी आणि सजीव सृष्टीवर परिणाम करणारे हानिकारक फटाके दूर ठेवून आपण दिवाळी साजरी केली तर वाढत्या प्रदूषणाला आळा घालता येईल. शिवाय आरोग्यही चांगले राहील. चला तर मग फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करूया! फटाके दूर करून हा आनंदाचा सण साजरा करूया!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *