चला मराठीतच बोलू या!!
मराठी भाषा हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचे, ऐतिहासिक परंपरेचे आणि सृजनशीलतेचे जिवंत प्रतीक आहे. ‘माय मराठी’ या संकल्पनेत तिचे शुद्ध, प्रमाण आणि अभिजात रूप जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध उपभाषांनी वाढवलेले तिचे वैविध्यही महत्त्वाचे आहे. मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे. मातृभाषा आपले अस्तित्व असते. बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय आणि वेगळे चैतन्य तसेच लोकजीवनाचे प्रतिबिंब सामावलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना जगातील एका अभिमानास्पद भाषेला आपण ‘माय मराठी’ म्हणतो, याचा आत्मीय अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे. हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने व्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, माध्यमांमध्ये आणि दैनंदिन संभाषणात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करण्याचा आहे.
मराठी भाषा गौरव दिन
वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 21 जानेवारी 2013 रोजी मराठी भाषा विभागाने अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. तसेच 3 ऑक्टोबर रोजी राज्यात अभिजात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. तर दरवर्षी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्यभरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, वाचन उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन्ही दिवसांत राज्यभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी आणि विस्तारासाठी चिंतन करण्याची ही संधी असते. चला, यावर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला समृद्ध करणार्या उपभाषांचा वाटा समजून घेऊया.
विविध उपभाषांचा समृद्ध वारसा
महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथ, महानुभाव आणि वारकरी संतपरंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिक व्यापक केले. आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे…तुम्हाला माहिती आहे, श्री चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदास, शूद्रक यांच्या शाकुंतल, मृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोलीभाषेत आहेत. वर्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, झाडीबोली, खानदेशी, गोंडी, बंजारा, कोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होते, तशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवा, विस्तार आणि ऊर्जा दिली आहे. उदाहरणार्थ, वर्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’मध्ये वर्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे. तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वर्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो. आचार्य प्र. के. अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वर्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.
कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जातात, तर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.
उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. ‘अक्का’ हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड-तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वर्हाडीमध्ये, झाडीबोलीत हिंदीचे, तर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आहे-स्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची!
उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश
दिले आहेत.
मराठीचा वापर वाढवू या!
उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असते-विशाल, सामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली. महाराष्ट्रात येणारा कोणताही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवतो आणि सोबत घेऊन जातो. ‘तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे. त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..
मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार, मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे, आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे, दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर, ही अत्यावश्यक
पावले आहेत.
Let’s speak in our native language!