नाशिक

आयुष्यावर बोलू काही

 

 

‘जीवनातील गणित’

 

 

नऊ महिने आईच्या पोटामध्ये राहिल्यानंतर बाळ जन्माला येतं. दिवसे गणिक वाढ होता- होता , तो महिन्यांचा होतो ..मग एका मागे एक असे वाढदिवस साजरे होत- होत तिशी, चाळीशी ,पन्नाशी, साठी …कुणी कुणी तर शंभरी पण गाठतं  !

 

बर गणित फक्त आयुष्य किती वर्ष एवढेच मोजण्यासाठी आहे असं नाही , जीवनाचं गणित काही वेगळच आहे. नऊ महिने बाळाला पोटात ठेवताना आई ज्या परिस्थितीतून जात असते, त्याचा थेट परिणाम गर्भातील बाळावर होत असतो आणि तशाच प्रकारे त्तो घडत असतो. जन्म झाल्यावर त्या तानुल्याला काहीच माहिती नसतं. त्याला फक्त कळत असते ती प्रेमाची भाषा… तो छकुला काय शाळेत जाऊन गणित शिकलेला नसतो तरीपण ठराविक मोजक्या व्यक्तींबरोबरच तो छान रमतो. म्हणजे पहा त्या तानुल्याला पण जीवनाच गणित येतंय ना…

 

जशी जशी मुलं मोठी होत जातात तशी तशी त्यांच्या जीवनाची गणित वेगवेगळी होत जातात. काहीजणांना फक्त एकटेच राहायला आवडतं म्हणजे त्यांचा संबंध एक अंकाशी जास्त.. काहींना शून्य होऊन जगायला सुद्धा आवडतं! असा शून्य ,की तो दुसऱ्या बरोबर जोडला गेला की त्या दुसऱ्याची किंमत नक्कीच वाढेल. जसे एका बरोबर शून्य लागला की दहा होतो ना अगदी तसंच.. काही जणांची कुटुंबाची व्याख्या पण वेगळी असते ‘हम दो -हमारे दो’ या दो- दो च्या चौकटीत ते खुश असतात कुणा पाचव्या ला महत्त्व पण देत नाही. परंतु समाजाशी त्यांचे बंध म्हणावे तसे जुळत नाही. कुणी कुणी सर्वांना घेऊन चालणारे म्हणजे त्यांचा संबंध मोठ्या अंकांशी जास्त  !:शेकडो -हजारो -लाखो अशा अंकांशी ते जुळलेले कारण त्यांना इतरांबरोबर राहायला आवडतं.

 

आपल्या सर्वांच्या जीवनात दोन अंक विशेष करून बघायला मिळतात , ते म्हणजे ३६ आणि ६३!

 

आता या अंकांचं आपल्या जीवनात काय महत्त्व किंवा यांनाच एवढं विशेष असं का म्हणतेय हे पण सांगते.

 

३६ या आकड्याचा विचार केला तर पहा यातली दोन्हीही अंक ३ आणि ६ हे दोन्हीही एकमेकांना पाठीला  पाठ लावून अगदी टाईटपणे उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे माणसाचं पण असतं.

 

साधारणतः ३६ चा आकडा चाळीशीच्या अगोदरचा आहे. कारण चाळीशीच्या आतला मनुष्य हा सर्व गोष्टींनी संपन्न असतो ताकदीने म्हणा किंवा पैशाने! परिपूर्ण असल्यामुळे तो कधीच कमीपणा घेत नाही, माघार घेत नाही. मला कुणाची गरज नाही ,मी त्याचं तोंडही पाहणार नाही अशी वाक्य साधारणता त्यांच्या तोंडी येतात. अशा वृत्तीमुळे सख्खे भाऊ पक्के वैरी होतात आणि हातात हात न मिळवता, पाठीला पाठ लावतात.

 

 

याच्या उलट ६३ हा आकडा… या आकड्याचा संबंध साठी ओलांडल्यावर बघायला मिळतो. यातील सहा आणि तीन हे आकडे जसे एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत…अगदी त्याचप्रमाणे साठी ओलांडल्यानंतर मनुष्य ही नम्र होतो. कारण ना ताकद, ना पैसा, ना तारुण्य, ना सत्ता! काहीच उरत नाही ,म्हणून नम्रपणे ६३ या आकड्याप्रमाणे एकमेकांना हातात हात देतात ,समजून घेतात… असा या दोन्ही आकड्यांचा मानवी जीवनाशी संबंध !

 

सभोवताली पाहिलं की नक्कीच लक्षात येईल की माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झालं की आई-वडिलांना विसरतो ,मुलं झाली की भाऊ बहिणींना विसरतो, पैसा आला की नातेवाईकांना -मित्रांना विसरतो… आणि या उलट म्हातारपणी आयुष्यभर ज्यांना विसरला त्या सर्वांची आठवण काढतो.६३ या आकड्याप्रमाणे प्रत्येकालाच जवळ घेऊ पाहतो.

 

 

वयाने कुणी लहान -मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात इतरांसाठी प्रेम जिव्हाळा असतो. ज्याच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि चांगल्या स्वभावामुळे नातेवाईकांची मित्रांची बेरीजच होत असते. त्याला कधीही अडचणी सोडवण्यासाठी माणसे शोधण्याची गरज भासत नाही, कारण त्याला  एकटे सोडून कोणी जात नाही.

 

३६ या आकड्याप्रमाणे एकमेकांकडे पाठ करून  अकडून राहण्यापेक्षा , ६३ या आकड्याप्रमाणे एकमेकांकडे तोंड करून हातामध्ये हात देऊन बरोबर राहून जीवनाचा आनंद लुटण्याचं कौशल्य त्यांना अवगत असतं. असं केल्याने आपली ताकद वाढेल, आयुष्य बेरंग होण्यापेक्षा अगदी खुशालीच होईल याची जाणीव त्यांना असते. अशी लोक आपल्या जीवनाचं गणित अचूकपणे सोडवतात आणि सुखाने जगतात.

 

जीवनातल्या गणिताचं आणखी एक उदाहरण म्हणजे, जसे एखाद्या रेषेला छोटी करायची असेल तर तिच्या खाली एक मोठी रेष काढून हे करता येतं,  त्यासाठी त्या लहान रेषेला पुसण्याची गरज लागत नाही. ही बाब आपल्या आयुष्याला पण लागू होते. आपल्याला जर कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या चांगुलपणावर शिंतोडे उडवून, त्यांना कमीपणा देऊन, त्यांच्या कृत्याला कमी लेखून- अपमान करून मोठं होता येत नाही. मोठा होण्या साठी दुसऱ्यांच्या कामापेक्षा अधिक चांगल्या परीने काम करूनही मोठं होता येत.

 

जीवनाचा गणित तसं पाहिलं तर खूप सोप्प आहे ,पण त्याचं उलगडा कसा करायचा हे माहीत असायला हवं.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago