चिठ्ठी आयी है…

 

आताच्या काळात आपल्याला ‘ पत्र ‘ हा शब्द ऐकू येतो का? नाही ना… कारण आज पत्राचा वापर कोणी करतच नाही. पत्रलेखन म्हणजे काय? तर पत्रलेखन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संदेश पाठवण्याचे साधन. पत्रलेखन ही एक कला आहे असे मला वाटते. ज्याद्वारे दोन व्यक्ती दूर असतांना सुद्धा एकमेकांना जोडले जाऊ शकतात. जेव्हा दोन मित्र, प्रियकर प्रेयसी किंवा दोन व्यवसायिक जे एकमेकांपासून दूर आहेत, परंतु त्यांना बोलायचे आहे, तेव्हा एकमेकांना वेगवेगळ्या कामांसाठी किंवा माहिती देण्यासाठी ते पत्र लिहितात आणि आपला संदेश समोरील व्यक्तीपर्यंत पत्राद्वारे पोहोचवितात. पण आजच्या आधुनिक युगात पत्र हा शब्दच कानावर पडत नाही. कारण पत्राच्या जागेवर आज फेसबुक, व्हाॅस्टॲप इत्यादी यांनी जागा घेतली आहे.
पुर्वीच्या काळात संदेश पाठवण्यासाठी पत्र हे एकमेव साधन होते. आणि खरं सांगू तेच खूप सुखकर होते. पण आज पाहता तरुणाईला व्हाॅस्टॲप, फेसबुक हेच सुखकर आणि सोईचे वाटते. अर्थात यात त्यांची काही चूक नाही. कारण आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीला पत्र लिहून त्याच्याकडून मिळणाऱ्या उत्तराची वाट पाहायची मजा तरुण पिढीने कधी अनुभवलीच नाही. आणि याउलट हीच मजा आधी पत्र पाठवण्यात यायची. पुर्वी पत्राच्या उत्तराची वाट बघायचा एक वेगळाच आनंद होता, माणसांमध्ये पेशन्स होते, आणि खूप महत्त्वाचे म्हणजे वाट बघायची तयारी असायची.
आजच्या स्मार्टफोन्स, आणि फेसबुक मेसेंजर च्या काळात पत्र म्हणजे काय? पत्राचे प्रकार किती? पत्राचे स्वरूप काय असते? हे माहीतच नाही. पण आपल्या शिक्षणसंस्थेने मात्र हे खुप छान केले. शाळेतच मुलांना पत्रलेखना विषयी शिकवले जाते. याने काय होते, मुलांना कळते तरी की पत्र म्हणजे नक्की काय? पत्र लेखनाचे फायदे काय? फक्त श्रीमंत किंवा गरीब व्यक्तीच नाही तर प्रत्येक व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी पत्र हे सर्वात स्वस्त आणि सोपे माध्यम आहे. मी स्वस्त आणि सोपे माध्यम यासाठी म्हणले कारण आज जे ८० ९० वर्षाचे आजी आजोबा आहेत ज्यांना स्मार्टफोन्स वापरता येत नाही त्यांच्यासाठी पत्र हे एक फायदेशीर साधन आहे. पत्र पाठवणे हे सर्वात कमी खर्चीक देखील आहे. म्हणजे आपण आपली संपूर्ण गोष्ट तपशीलवार लिहू शकतो आणि अगदी कमी खर्चात पत्राद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो प्रेम, राग, कुतुहल, आदेश, आमंत्रण इत्यादी अनेक अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी पत्रलेखन वापरले जाते. आणि अजुन एक खास गोष्ट आहे ती म्हणजे पत्रात लिहीलेली माहिती गोपनीय ठेवली जाते. पत्र पाठवणारा आणि पत्र स्वीकारणारा यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या व्यक्तिला पत्रात लिहीलेला संदेश मिळवण्याचा अधिकार नाही.
मात्र आजच्या टेलिफोन, ईमेल, एसएमएस आणि सोशल मिडियाची अनेक प्लॅटफॉर्म आहेत. जिथुन आपण आपला संदेश आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. पण एक मनापासून सांगते प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रच.

पियुषा खरे- केळकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *