सिडको : विशेष प्रतिनिधी
दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी चालकाने ग्राहकाला केलेल्या बेदम मारहाणीत ग्राहकाला प्राण गमवावे लागल्याची घटना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम च्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे( वय ५९ रा. शिवपुरी चौक) यांची पान सिगरेट टपरी आहे. बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता सुमारास विशाल भालेराव (वय ५०) हा इसम दारुच्या नशेत बापु सोनवणे यांच्या टपरीवर आला. यावेळी १० रुपयाची सिगारेट टपरी चालकाने ११ रुपयाला दिली.सिगरेटची मुळ किंमत १० रुपये असतांनाही ११ रुपये का घेतो असा टपरी मालकाला जाब विचारत भालेराव याने टपरी चालकाला शिवीगाळ करीत टपरीतील गोळ्या ,बिस्किटे आणि चॉकलेटच्या बरण्यासह इतर साहित्याची नासधूस केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हातघाईवर आल्यानंतर टपरी चालक बापु सोनवणे याने विशाल भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली. यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास त्यात खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर तो घरी जाऊन आराम करत असतांना त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीच्या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे याला ताब्यात घेतले आहे दरम्यान . या मारहाणीच्या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे.