जीवनशैली..!

आई सकाळी सडा-रांगोळी करायची.

अंगणातल्या तुळशीची मनोभावे पूजा करायची.

आणि स्नानसंध्या झाली की कपाळावर छान

गरगरीत लालभडक कुंकू हीच तिच्या सौंदर्याची

परिभाषा होती… पण आज सौंदर्याची परिभाषा बदलली आहे.

प्रत्येकाला सुंदर राहावंसं वाटतं. प्रत्येकाला स्लीम राहावंसं वाटतं. प्रत्येकाला इतरांपेक्षा वेगळे कपडे परिधान करावेसे वाटतात. जेणेकरून आपल्याकडे लक्ष केंद्रित होईल. इतरांपेक्षा कसं छान दिसता येईल. त्यामुळे सारखा मनात स्ट्रेस निर्माण होतो.
आजकाल कर्तृत्वापेक्षा सौंदर्यानेच आकर्षित करण्यावर भर दिसतो. आपण सुंदर दिसावे, आपले सौंदर्य खुलावे असेच प्रत्येकाला वाटत असते. मग सुरू होते स्पर्धा चढाओढीची. मॅचिंगचा तर जमाना आहे. अगदी डोक्यापासून नखापर्यंत.
मॅचिंग टिकली, लिपस्टिक, गळ्यातील पोत, साडी, ब्लाऊज, बांगड्या, कानातले, नाकातले, घड्याळ, चप्पल, नेल पेन्ट, पर्स आणि आता तर डोक्यावरचे भुरभुरणारे केसंही मॅचिंग…काय म्हणावे याला..?
हा सर्व अट्टहास कशासाठी…तर फक्त सुंदर दिसावं म्हणून.
हे सर्व कमी की काय म्हणून ब्यूटिपार्लर. केस सेटिंग, अ‍ॅब्रोज फेसियल, ब्लिचिंग मसाज, हेअर रिमूव्ह,.. वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, साबण, पावडर, सिरम, लाइनवर, मस्करा, परफ्युम, फेसवॉश काय काय लावतात चेहर्‍याला…
लाव हळद हो गोरी..!
या सर्व बाह्य सौंदर्याचे आकर्षण.. आणि खर्च महिन्याकाठी तीन/चार हजारांचा चुराडा… मग बजेट कोलमडणार… नाही का? मग स्ट्रेस नकळत वाढतो…बरं यात पुरुषही मागे नाहीत… त्यांनाही वाटत असतं हँडसम दिसावं… मग तेही पोट सुटू नये म्हणून आटापिटा करत असतात…जिम लावतात, पण खाण्यापिण्याचे पथ्य नाही. व्यायामाचा अभाव..कसं हँडसम होता येईल?… साधारण सलूनमध्ये गेले तरी केसांचा हेअर ड्राय करण्यासाठी 250/300 रुपये लागतात. महिन्याकाठी मग डोक्यावर परत चांदी येतेच. ते लपवण्यासाठी पुन्हा ड्राय. काही पुरुषांची सुंदरता वाढण्याऐवजी विद्रूप दिसू लागतात. कारण वयोमानाप्रमाणे केसात बदल होतोच. शरीरातही बदल होतोच. मनाने कितीही तरुण राहा.. वय लपवता येत नाही हे मान्य केले पाहिजे, स्वीकारायला पाहिजे.. नाहीतर स्ट्रेस आहेच आपल्या चेहर्‍यावरचा आनंद हिरवायला.
जितके आपण साधे राहू तितकी आपल्या कर्तृत्वात भर पडते. नाही की वेशभूषेत बदल केल्याने…
स्ट्रेस कमी करायचा असेल तर अवांतर खर्च टाळायला पाहिजे व एकमेकांबद्दल असूया टाळली तर स्ट्रेस कमी होऊन आनंद वाढवता येईल.
अनावश्यक खर्च टाळून जर आपल्या सौंदर्यात भर पडली तर खानपान आणि साधं राहणीमान. सौंदर्यप्रसाधनामुळे चेहर्‍यावर तात्पुरता फरक जाणवतो, पण… आयुष्य सुंदर करायचं असेल तर व्यायाम, योगा व मानसिक स्वास्थ्य यावर भर दिला तर मनोमन खूप छान वाटेल व स्ट्रेसही कुठल्या कुठे पळून जाईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *