लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात राहणार्या उच्चशिक्षित तरुण-तरुणींमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण अधिक आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही महिने राहून पहायचे जर एकमेकांचा स्वभाव पटला तर ठीक नाहीतर ब्रेकअप करून पुन्हा नवीन जोडीदार शोधून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, असा हा प्रकार. ज्यांना विवाहसंस्था मान्य नाही किंवा विवाह करायचा नाही असे तरुण-तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपला पसंती देत आहेत. केवळ अविवाहित तरुणच नाही, तर घटस्फोटित व्यक्तीही लिव्ह इनमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपकडे विवाहसंस्थेला पर्याय म्हणून पाहणारा मोठा वर्ग समाजात निर्माण होत आहे. भारतीय कायद्याने लिव्ह इन रिलेशनशिपला पूर्ण मान्यता दिलेली नसली तरी लिव्ह इन रिलेशनशिप कायद्याने बेकायदेशीर किंवा गुन्हाही ठरवलेला नाही. भारतीय कायद्याने या नात्याला काही प्रमाणात संरक्षण आणि अधिकारही दिले आहेत पण हे करताना कायद्याने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या जोडप्यांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे पाळणे बंधनकारक आहे. असे असले तरी या मार्गदर्शक तत्वांचे पालन संबंधित जोडप्यांकडून होते का हा संशोधनाचा विषय आहे. मुळात लिव्ह इन रिलेशनशिपची व्याप्तीच इतकी अस्पष्ट आहे की आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची लक्ष्मणरेषाच उभयंतांना समजत नाही. त्यामुळे अशा संबंधात कालांतराने कटुता निर्माण होते. दोघांचे पटेनासे होते. विवाहसंबंधांमध्ये एकमेकांविषयी जो आदर असतो तोे लिव्ह इनमध्ये नसतो. दोघेही एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाद वाढत जातात. त्यांच्यात मध्यस्थी करणाराही कोणी नसतो. त्यामुळे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या जोडप्यांचा न्यायालयात पोहोचण्याचा प्रकार अलीकडे खूप वाढला आहे. एकदा वाद न्यायालयात पोहोचला की न्यायालयात हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे संबंधितांचे जीवनही उद्ध्वस्त होते. नातेवाईक, समाजातही अवहेलना होते. काही वेळा तर वाद इतका विकोपास जातो की वादातून खूनही होतो. दोन वर्षांपूर्वी दिल्लीतील श्रद्धा वालावकर या तरुण मुलीचा तिच्याच लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या जोडीदाराने निर्घृणपणे खून केला होता. त्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीतील या घटनेची नंतर पुण्यातही पुनरावृत्ती झाली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमधल्या या घटना पाहिल्या की लिव्ह इनमध्ये राहणे किती सुरक्षित आहे, याचा विचार तरुणांनी करायला हवा. लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने बेकायदेशीर ठरवले नसले तरी समाजाने अजूनही या नात्याला मान्यता दिलेली नाही. समाजाने अजूनही लिव्ह इन रिलेशनशिपला स्वीकारले नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या जोडप्यांकडे समाज कुत्सित नजरेनेच पाहतो. म्हणजे ज्या सुखासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारला ते सुख तर वाट्याला येतच नाही. उलट दुःखच वाट्याला येते. खरंतर लिव्ह इन रिलेशनशिपला केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून पाहिले तर कोणीही लिव्ह इन रिलेशनशिपचे समर्थन करणार नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असतात आणि त्या पूरकतेला बळ देण्यासाठीच अनादि काळापासून विवाहसंस्था अस्तित्वात आली आहे. विवाह हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विवाह संस्कृतीत काही त्रुटी असतीलही. विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये पटत नाही, त्यांच्यात वाद होत नाही असे कोणी म्हणणार नाही. नवरा-बायकोमध्येही वाद होतो. काहींचा वाद न्यायालयातही जातो. काहींचा घटस्फोटही होतो म्हणून विवाहच नको, लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय आहे असे कोणी समजत असेल तर ते चुकीचे आहे. लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र राहतात, पण त्यांना एकमेकांप्रति जबाबदारीचे भान नसते. याउलट विवाह झालेल्या व्यक्तींना एकमेकांप्रति जबाबदारीचे भान असते. केवळ जबाबदारीच नाही, तर प्रेम, त्याग आणि तडजोडीबरोबरच विवाहात समर्पण भावनाही असते. मात्र, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकीकरण, भौतिकवादी दृष्टिकोन, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची प्रवृत्ती यामुळे शहरात विशेषतः मेट्रो शहरात विवाहसंस्थेवरच प्रहार केला जात आहे. आजची उच्चशिक्षित तरुण पिढी कोणत्याही जबाबदारीशिवाय बंधनमुक्त जीवन जगण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ते लिव्ह इनकडे वळत आहेत, पण तेही अटी आणि शर्तीवर बेतलेले असल्याने ते संबंधीही फार काळ टिकत नाहीत. त्यापेक्षा समानता, प्रेम, त्याग आणि जबाबदारीची जाणीव असलेला विवाह लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा हजारो पटींनी चांगला आहे, हे लिव्ह इनकडे वळणार्या तरुणांनी समजून घ्यायला हवे.
– श्याम ठाणेदार