साधू-महंतांची उपस्थिती; हजारो भाविक सहभागी
भगवान जगन्नाथ की जय…भगवान बलभद्र की जय… सुभद्रा माता की जय, असा घोष करत साधू-महंतांच्या उपस्थितीत हजारो भाविकांनी श्री भगवान जगन्नाथ सवाद्य रथोत्सवात सहभागी होत आनंद लुटला. शुक्रवारी (दि.27) जुना आडगाव नाका येथून रथोत्सवास उत्साहात सकाळी दहा वाजता सुरुवात होऊन दुपारी एकच्या सुमारास समारोप झाला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथात श्री जगन्नाथांची मूर्ती ठेवली होती.
यावेळी महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज, नागपूरचे मुधोजी राजे, कैलासमठाचे महंत स्वामी संविदानंद स्वामी, फलाहारी महाराज, बालकदास, राजारामदास, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामस्नेहीदास महाराज, आचार्य कालिकानंद महाराज, स्वामी रामतीर्थ महाराज आदींसह साधू-महंतांच्या हस्ते भगवान जगन्नाथ प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. रथोत्सवात सहभागी बालकांनी भगवान शंकर, ब्रह्मदेव, कालिका माता, पंचमुखी हनुमान यांसह विविध देवदेवतांच्या भूमिका साकारत हातात भगवे ध्वज घेतले होते. रथोत्सव मार्गावर महिला भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढून रथयात्रेचे स्वागत केले.
जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथून रथयात्रेत अग्रभागी पारंपरिक वाद्य, ढोलपथक, बँड, मर्दानी खेळ पथक, पाठशाळेचे विद्यार्थी, वारकरी, कीर्तनकार, पारंपरिक वाद्य तसेच रथाच्या दोन्ही बाजूला दिगंबर आखाडा आणि श्री खाकी आखाड्याचे हनुमान ध्वज निशाण, तसेच ब्रह्मवृंद मंत्रोच्चार व वेदपठण करत रथ पुढे आडगाव नाक्याकडून गणेशवाडीकडे मार्गस्थ झाला.
रथोत्सवात मनपा आयुक्त मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप, पंकज भुजबळ, वसंत गिते, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेतेे सुनील बागूल, स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते, अरुण पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, अंकुश चिंतामण, ब्रह्मदत्त शर्मा, भगवान पाठक, नंदू कहार, किरण सोनवणे, उमापती ओझा, सुभाष अग्रहरी, नंदू मुठे, सचिन लाटे, नागेश चव्हाण, ब्रह्मदत्त शर्मा, दिगंबर धुमाळ, नरहरी उगलमुगले आदींसह भाविक सहभागी झाले होते. सचिन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. मालेगाव स्टँड मित्रमंडळातर्फे मामा राजवाडे यांच्यातर्फे रथाला दीडशे किलो वजनी फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. रथयात्रेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.
या मार्गावर जोरदार स्वागत
श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. तेथून आडगाव नाका, गणेशवाडी, आयुर्वेद रुग्णालय, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सितागुंफा मार्गे काळाराम मंदिर, नागचौक, श्री काट्या मारुती मंदिर चौक, श्री कृष्णनगर आदी भागांतून मिरवत पंचमुखी हनुमान मंदिर येथे सांगता झाली. दरम्यान, ज्या मार्गावरून रथ मार्गक्रमण करत होता तेथे स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. रथयात्रेच्या स्वागताचे ठिकठिकाणी लावलेले बॅनर लक्ष वेधून घेत होते.
महिला भाविकांनीही ओढला रथ
शहरातून काढण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेत सहभागी पुरुष भाविकांनी रथ ओढला. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रथोत्सवात सहभागी महिला भाविकांनी रथ ओढत श्री भगवान जगन्नाथांचा जयघोष केला.