बडगुजरांच्या हाती ‘कमळ’, महापालिकेत वाढणार बळ!

‘सलीम कुत्ता’वरून आकांडतांडव ते प्रवेशासाठी पायघड्या

नाशिक : गोरख काळे
मागील काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपअंतर्गत नाराजीनाट्य रंगले होते. ही नाराजी एवढी होती की, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी कॅमेर्‍यासमोर येऊन बडगुजरांच्या प्रवेशाला आव्हान दिले; परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी स्थानिक आमदारांसह माजी नगरसेवकांना कात्रजचा घाट दाखवत मोठ्या थाटात बडगुजरांचा पक्षप्रवेश केला. त्यांच्यासमवेत माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांचेही प्रवेश झाले. खासदार संजय राऊत यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे असलेल्या बडगुजरांच्या हाती ’कमळ’ आल्याने येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचे बळ वाढणार आहे.
बडगुजरांच्या भाजप प्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे की, ज्या भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासमवेत बडगुजर यांंचे पार्टीतील फोटो दाखविल्यानंतर नाशिकसह राज्यात खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता त्याच बडगुजरांसाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पायघड्या घातल्या. मात्र, यामागे भाजपची स्मार्ट खेळी आहे. नागपूर, पुणे, पनवेल या महापालिकांमध्ये सन 2017 साली निवडणुकीत क्लीन स्वीपदेत एकतर्फी विजय साकारला होता. त्याच धर्तीवर भाजपने नाशिक महापालिकेसाठी शंभर प्लसचा नारा दिला आहे. सर्वाधिक जागा जिंकून मित्रपक्षांसह विरोधकांना चितपट करण्याची भाजपची रणनीती आहे. भाजपकडून शंभर प्लसचा नारा दिला जात असला, तरी 80 ते 90 पर्यंत त्यांना नगरसेवकांची संख्या घेऊन जायची आहे. मात्र, विरोधकांवर सायकॉलॉजिकल दबाव म्हणून आतापासूनच शंभर प्लसचा नारा देण्यात आला आहे.
शहरात दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून, अशावेळी महापौरांसह सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असावेत, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांची इच्छा आहे. या रणनीतीची सुरुवात सुधाकर बडगुजर यांच्यापासून सुरू झाल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत 122 नगरसेवकांची संख्या असून, यापूर्वी 65 नगरसेवक एकट्या भाजपने निवडून आणले होते. लोकसभेतील विरोधी वातावरणानंतर विधानसभेत जोरदार कमबॅक करत पुन्हा भाजपची लाट आली.

बडगुजर पूर्वाश्रमीच्या सहकार्‍यांशी भिडणार!
शिवसेना ठाकरे सेनेचे तत्कालीन उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये गेल्यावर पक्षाला त्यांच्याकडून आगामी निवडणुकीत अपेक्षा असेल. दरम्यान, महापालिका निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात होणार आहे. बडगुजर भाजपवासी झाल्याने येत्या निवडणुकीत त्यांचा अजय बोरस्ते, विजय करंजकर, प्रवीण तिदमे यांच्याशी सामना होणार आहे. शिवसेनेत असताना यांच्यात अंतर्गत गटबाजी होती. करंजकर, बोरस्ते, तिदमे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बडगुजरांवर टीका केली होती. शिंदेसेनेचे महानगप्रमुख तिदमे ज्या सिडको विभागातून येतात तेथे बडगुजर व तिदमेंमध्ये टोकाचा संघर्ष आहे. आगामी महापालिका निवडणूक महायुतीतील सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटात होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

उपरे-निष्ठावानांत संघर्ष?
सुधाकर बडगुजरांसह त्यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांना पक्षात कशी वागणूक मिळेल, हे येत्या निवडणुकीतच समजेल. विशेषत: उपरे विरुद्ध निष्ठावानवरून संघर्ष पेटण्याची भीती काही भाजप कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे याकडे मंत्री गिरीश महाजन यांनाच लक्ष घालावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे, आमदार सीमा हिरे व त्यांचे काही समर्थक माजी नगरसेवक बडगुजर यांच्याशी कसे जुळवून घेतील, हे पाहणे औत्सुक्याचेे ठरेल. बडगुजर शिवसेनेत असताना माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील टोकाचा संघर्ष शहराने पाहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. एवढ्या जलद गतीने राजकीय चक्रे फिरतील याचा विचार खुद्द आ. हिरे व शहाणे यांनीही केला नसेल. ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, त्याच बडगुजरांचा मुंबई पक्ष कार्यालयात दिमाखात प्रवेश झाल्याचे पाहून आता करावे तरी काय, अशी अवस्था काहींची झाली असेल.

वडील भाजपमध्ये, मुलगा शिवसेना ठाकरे गटात

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह त्यांची कन्या माजी महापौर नयना घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तरी त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप अद्याप शिवसेना ठाकरे गटातच असल्याचे चित्र आहे.

यासाठी भाजपला हवेत बडगुजर

बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख असताना ठाकरे गटाचे पक्षसंघटन वाढवले, तसेच आक्रमक बाणा असल्याने भाजपला अशा चेहर्‍याची आवश्यकता होती. महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या माध्यमातून मनपा कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अग्रणी, शिवाय महापालिकेतील प्रशासकीय जाण आहे. बडगुजर यांचा शहराबरोबरच नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर, देवळाली, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या मतदारसंघांतही संपर्क आहे. ते भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फायद्याचे ठरेल.

मुर्तडकांचा नऊ महिन्यांतच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र!

मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, नऊ महिने होत नाही तोच त्यांनी ’जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचा शिंदे गटाला शह

शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकीच्या द़ृष्टीने ठाकरे गटाच्या एक-एक माजी नगरसेवकाला गळाला लावत होते; परंतु भाजपने सुधाकर बडगुजरांसह माजी महापौर अशोक मुर्तडक व इतर दहा माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन शिंदे गटाला शह दिला आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटात सर्वकाही ठीक नाही, हे वारंवार दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत एकत्र येण्याचे टाळत असल्याचे सतत बोलले जाते. त्यातच नाशिक महापालिका दोन्हींसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

आ. हिरेंची अखेरपर्यंत दखल नाही!

आमदार सीमा हिरे यांचा अखेरपर्यंत विरोध असूनही पक्षाने त्यांना महत्त्व न देता दिमाखात बडगुजरांच्या गळ्यात भाजपची शाल टाकून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *