प्रेम, सौंदर्य हे… शाप की वरदान?

प्रेम करा, पण तुमच्या हृदयाशी कुणाला खेळू देऊ नका असे वाक्य एका स्टेटसला वाचण्यात आलं आणि मनाला भावताच त्यावर लिहावंसंच वाटलं…
भरचौकात रहदारीची गंमत बघत सीमा तीन तासांपासून कुणाची तरी वाट बघत होती.. अंधार होत आला तरीही तिचा प्रभाकर अजून आला नव्हता.. नवीनवी मैत्री आणि मग प्रेमातून दोघांनाही भेटीची ओढ लागलेली होती…कॉलेजात जाणारी सीमा घरी मैत्रिणीकडे बर्थ डे पार्टीला जातेय सांगून पाच वाजताच आली होती….प्रभाकरचा कर्तृत्वसंपन्न जिद्दीचा संघर्षाचा प्रवास सीमाला भावला होता, तर सीमाचे सौंदर्य, निर्मळ मन, खळखळून हसणे, बोलणे त्याला भावले होते.
पण खूप वेळ झाल्याने आता सीमाचा रागाचा पारा चढला. ती फोनवर फोन करत होती. येतो अर्धाच तासात गं. कामात अडकलोय. ट्रॅफिकमध्ये अडकलोय, असेच उत्तर तिला मिळत होते…
पण तरीही तिला आस होती प्रभाकरची भेट घेतल्याशिवाय तिला परत जाणे मान्य नव्हते..पण चहूबाजूने अनेक संशयी नजराही तिच्यावर खिळल्या होत्या..पण सारं बळ एकवटून ती प्रभाकरची वाट पाहत होती..
अखेर त्याची गाडी पोहोचली आणि तिच्या जीवात जीव आला…त्याला बघताच तिचा सारा राग विरघळून गेला…त्यानेही सॉरी म्हणत जणू तिला सुरक्षाकवचासह प्रेमाचा विश्वास दिला होता…मात्र या भेटीनंतर महिना उलटला तरी प्रभाकर फिरकला नाही. त्याने सीमाशी बोलायला, टाळायला सुरुवात केली..फोन उचलेना, संवाद होईना. सीमाच्या मनात ना ना शंका घर करू लागल्या…तरीही तिला विश्वास होताच प्रभाकर भेटेल..!
पण हे प्रेम कायम टिकेल का? नेहमीच प्रभाकर असा उशीर, कामातच वेळ देणार असेल तर सीमाने समजून घेत नेहमी वाट बघायचीच भूमिका घ्यायची का? तिच्या मनभावनांचाही प्रभाकरने आदर ठेवत विचार केला पाहिजेच ना? तिचा स्वाभिमान दुःखावला गेला तर नैराश्य साथ देते…याची झळ कुटुंब, समाज, स्वकर्तृत्व सर्वांनाच बसते….
काय वाटते यावर …! हे असे किती प्रभाकर आणि सीमा आपल्याला समाजात पाहायला भेटत असतात…
पण काय असते खरे प्रेम आणि त्यातील व्याकुळता? काय असते तनमनाची सुंदरता? की फक्त आभास असतो आकर्षणाचा? तर कधी एखादा करतो विचार … प्रेमात जीवही देण्याघेण्याचा?
एखादी सुंदर असली मग हा काय तिचा दोष म्हणावा का? जेव्हा तिच्यावर सतत खिळणार्‍या नजरांचा तिला सामना करावा लागतो, तेव्हा तिला सौंदर्य शाप वाटू लागते…!
प्रेमाच्या नगरीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करताना का विसरले जाते भान आणि त्यातील दाहकता…जेव्हा कधीकधी एकतर्फी विकृतीतून बळी पडतात अनेक रिंकू पाटील, अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या निरागस कुमारिका..! कधी नकार पचवताना बळी जातो एखाद्या युवकाचा…! कधीकधी मानप्रतिष्ठासाठी समाजच बळी घेतो दोन प्रेमींचा? जीव जन्माला घालणे मानवाच्या हातात आहे, पण कुणाला जीवे मारण्याचा अधिकार मानवाला दिलेला नाही तरीही कधीकधी हे क्रुरकर्म मानवच करतोय आणि असं करताना त्याच्या आतलं हृदय कुठे हरवते हा प्रश्नच? अजूनही सतत समाजात कुठेना कुठे घडणारं धगधगतं वास्तव आहे हे… मन पिळवटून टाकणार्‍या अशा घटनांची सतत वाढ होताना दिसतेय…
वर्तमानपत्र, सोशल मीडिया, भोवतालच्या घटनांतून झळकणार्‍या बातम्या वाचताना जाणवते की प्रेमभंग, ब्रेकअप ह्या समस्यांनी तर कळसच गाठलाय आजच्या वास्तवात…! युवा पिढीच नाही तर विवाहितही सुखशांतीच्या शोधात वैयक्तिक, कौटुंबिक समस्यांमुळे अडकताय या भोवर्‍यात. या समस्येचे मूळ खरंतर हृदयातच जोडले गेलेय म्हणून हृदयावर वैचारिकतेतून मेंदूचे नियंत्रण हवेच…
हृदयभावना जुळून, वैचारिकता जपत, कुणाचेही नुकसान न करता न दुखावता
निःस्वार्थीपणे सहजीवनात गुणदोषासह जेव्हा फक्त, दोन मनं एकत्र येतात. सुखदुःखात साथ देतात शेवटपर्यंत… कदाचित हेच शाप नव्हे, तर दैवी वरदान असावं खरं प्रेम..!

Love, beauty… a curse or a blessing?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *