ओवैसी: प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य
वडाळागांव : प्रतिनिधी
लव्ह आणि जिहाद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणे याला लोक जिहाद समजतात. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो. जर कोणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करीत असेल तर इतरांना त्रास होण्याचे काही कारण नाही. भाजपाशासीत राज्यात जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला तो असंवैधानिक आहे, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिकमध्ये खासगी दौर्यावर आलेल्या ओवैसी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देशात भाजपाचे सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून अल्पसंख्याक समाजाला अनेक त्रास सहन करावे लागत आहे. या समाजाला मॉबलिचिंगला सामोरे जावे लागत आहे.
अनधिकृतपणे घरे पाडण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये हलवानीत 4 हजार घरात राहणारे गरीब 70 हजार कुटुंबीय थंडीत मागील काही दिवसापासून त्यांच्या घराच्या संरक्षण साठी भांडत आहे.
देशात लव्ह जिहादपेक्षा बेरोजगारी व महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे. जगात सर्वात जास्त बेरोजगारी भारतात आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. याकडे लक्ष नाही, कोणी लग्न करत आहे, कोणी प्रेम करत आहे तर त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. राज्यात शेतकर्यांचे प्रचंड हाल आहे. यावर कोणीच काही बोलत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे. असेही ओवैसी म्हणाले. यावेळी एम आय एम चे जावेद मुन्शी, मुख्तार शेख़, रमज़ान पठाण, फरिद शेख, मोसीन शाह, हैदर शेख, अकीब शेख, सलीम शेख, सैफ सैय्यद आदी उपस्थित होते.
वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय आंबेडकरांचा
युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता.आम्ही त्यांच्या सोबत आहे, मी त्यांचे आज ही आदर करतो, कालही करत राहिल, वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर यानी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो..? आमची युती का तुटली, ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता येथे उभे राहून कसं बोलू..? ही एक मोठा चर्चा आहे.
’ये ओवेसी साहब है’
बुधवारी औरंगाबादहून नाशिककडे निघालेले खा.असदुद्दीन ओवेसी हे कोपरगाव तालुक्यातील एका मशिदमध्ये संध्याकाळी नमाज पठणासाठी आले, मात्र, परिसरातील नागरिकांनी ओवेसीना ओळखलेच नाही. नमाजनंतर अनेकांनी ’आपको कही देखा है’ म्हणत गर्दी केली. काही वेळातच सोबत असलेल्या एका व्यक्तीने ’ ये ओवेसी साहब है’ असे सांगितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. नंतर लोकांनी त्यांचे स्वागत केले.