मुलीच्या अपहरणानंतर आईवडिलांची आत्महत्या; अपहरणकर्त्याच्या घरासमोर नातेवाइकांनी केला अंत्यविधी

सर्वतीर्थ टाकेद: वार्ताहर
मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इथं घडली. पण ज्या तरुणानं मुलीचं अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, रविवारी दुपारी निवृत्ती खातळे हे आपली पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे आणि मुलीसह भरविहिर गावाकडं जात होते. वाटेत घोटी हायवे जवळ वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली. यानंतर त्यांनी मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले.
एकतर्फी प्रेमातून आपल्या 19 वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं निराश झालेल्या खातळे दांपत्यानं भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून तर मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहिर येथील गावकरी आणि नातेवाईकांनी खातळे दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *