माधव मधील मा चे पुढे काय?
दृष्टिक्षेप : रमेश शेजवळ
लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतरही नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा छगन भुजबळ यांचा कोणताही विचार नव्हता. या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने आपल्याला संधी मिळणार नाही, असे त्यांनी गृहीत धरले होते. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर नाशिकची जागा महायुतीत कोणत्या पक्षाकडे जाणार, याविषयी चर्चा सुरू होऊनही भुजबळ यांचे नाव चर्चेत नव्हते. होळीचा सण साजरा होत असताना दिल्लीत भाजपाने नाशिकमधून भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे कळले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भुजबळ यांचे नाव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुचविले. यावर भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, भाजपाकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्याकडून खातरजमा करवून घेतली. सातार्याच्या बदल्यात नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उमेदवार भुजबळ, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जाऊ लागले. यानंतर त्यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. यामुळे गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली. शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना भेट मिळाली नाही. त्यानंतर त्यांना भेट मिळाली पण शब्द काही मिळाला नाही. त्यातच गोडसेंऐवजी अजय बोरस्ते व भाजपाचे राहुल ढिकले यांचेही नाव चर्चेत आले. यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला यावरुन तिढा निर्माण झाला. परिणामी उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडत होती. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अजित पवार यांनी आपली उमेदवारी पक्की केली असेल, तर जाहीर का करत नाही? असा प्रश्न भुजबळ यांना पडला होता. एक एक दिवस वाट पाहता पाहता तेही कंटाळून गेले. त्यातच भुजबळ यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असे बोलले जाऊ लागले. कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे सातारच्या जागेवर भाजपाने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करुनही नाशिकच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली गेली नाही. सर्वकाही ठरले असेल, तर आपल्या नावाची घोषणा का होत नाही? असा प्रश्न भुजबळ यांना पडला आणि त्यांनी बिनशर्त माघार घ्यावी लागली, असे दिसत आहे.
भुजबळ यांनी बिनशर्त माघार घेतल्याने हेमंत गोडसे यांना नक्कीच दिलासा मिळाला. त्यांनी भुजबळ यांचे आभारही मानले. माघारीनंतर आपली उमेदवारी जाहीर होईल, ही अपेक्षा गोडसेंची होती. पण, अद्यापपर्यंत गोडसे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली नाही. गोडसेंऐवजी अजय बोरस्ते किंवा आमदार राहुल ढिकले यांची नावे चर्चेत असली, तरी त्यापैकी कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही. ही वस्तुस्थिती पाहता महायुतीला नाशिकचा तिढा सोडविण्यात अडचण येतच असल्याचे दिसत आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क कायम असल्याचे भुजबळ यांनी बिनशर्त माघार घेताना म्हटले आहे. यावरुन या जागेवर महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांचा दावा कायम आहे. उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या निर्णयावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अर्थात, भुजबळ यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारीचा इतिहास कथन करताना मोदी, शहा, फडणवीस, अजित पवार, बावनकुळे यांची नावे घेतली. या सर्वांनी आपले नाव निश्चित केले असेल, तर घोषणा का केली जात नाही, असा सवाल त्यांनी याच नेत्यांना अप्रत्यक्षरित्या केला. आता प्रश्न असा आहे की, महायुतीचा उमेदवार कोण? गोडसे, बोरस्ते, ढिकले यांच्यापैकी कोणाचेही नाव जाहीर करण्यात अडचण कोणती? राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सोडला नसेल, तर या पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण? हेही गुलदस्त्यात आहे. जी नावे चर्चेत आहेत, त्यांना सोडून आणखी एखादे नाव समोर येते की काय? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भुजबळांनी आधी माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव सुचविले होते. त्यांचे नाव समोर येऊ शकते. पण, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती दिल्याने समीर भुजबळ यांचे नाव मागे पडलेले आहे.
भुजबळांचे नाव चर्चेत आले तेव्हा ‘माधव’ समीकरणाची चर्चा सुरू झाली. ओबीसी मतदारांना आपलेसे करण्यासाठी भाजपाला ‘माधव’ आठवल्याचे बोलले जात होते. भुजबळ हे माळी असल्याने ‘मा’! राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर धनगर असून ते परभणीतून निवडणूक लढवत असल्याने ‘ध’! पंकजा मुंडे बीडमधून उमेदवार असल्याने ‘व’! असे ‘माधव’ समीकरण आहे. भुजबळांच्या माघारीनंतर ‘माधव’मधला ‘मा’ गायब झाला आहे. ‘मा’ला वगळून भाजपाला चालेल काय? महाराष्ट्रातील 48 जागांवर महाविकास आघाडी संघटितपणे निवडणूक लढवत आहे. राज्यात महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून आला आहे. भाजपाच्या सर्वेक्षणातही तोच अंदाज असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत ‘मा’ला वगळले, तर महायुतीची अडचण होऊ शकते. मोदी, शहा, अजित पवार, फडणवीस, बावनकुळे यांनी भुजबळांचे नाव पक्के करुनही त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे ओबीसी समाज विशेषतः माळी समाज नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन भुजबळ यांना उमेदवारी स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीतून साकडे घातले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार असल्याने उमेदवारी जाहीर करण्याची घाई महायुतीने केली नसावी, असे गृहीत धरले, तरी महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेले शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे प्रचारात बरेच पुढे गेले आहेत. तर महायुतीचा प्रचारच नाही. प्रचारातील पिछाडी भरुन कशी काढायची? हाच प्रश्न भुजबळ यांना भेडसावत होता. हेही त्यांच्या माघारीचे कारण दिसते. पण, भुजबळ हे काही मतदारसंघाला नवखे नाहीत. महायुती मजबूत असल्याने प्रचारातील पिछाडी भरुन काढता येऊ शकते. माघार घेऊनही मागे घेऊनही भुजबळ यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीत राहण्याची शक्यता आहेच. पण, नाहीच जमले काही, तर राज्यसभेवर भुजबळ यांना घेण्याची घोषणा करुन ‘मा’ कायम ठेवण्याचा प्रयत्न असण्याची दुसरी शक्यता.