नाशिक ः प्रतिनिधी
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्या गोदावरी महाआरतीस विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले, जेव्हा देशभरातील विविध सैनिकी प्रशिक्षण केंद्रांतून आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक युवा सैनिकांनी आरतीत सहभाग घेतला.
या भव्य महाआरतीत सहभागी होताना जवानांनी ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत संपूर्ण घाट परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून टाकला. त्यांनी गोदावरी मातेचे वंदन करत भारतमातेच्या रक्षणासाठी बळ प्राप्त होवो, अशी सामूहिक प्रार्थना केली. उपस्थित भाविकांच्या मनात या दृश्याने अभिमान, आदर आणि भावनिक
ऊर्जेचा अनुभव आला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून ही महाआरती सातत्याने व भक्तिभावाने आयोजित करत आहे. ही आरती नाशिककरांसह देशभरातील व विदेशातील श्रद्धाळू भाविकांसाठीही एक आकर्षण ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे देश-विदेशातील पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे.
या विशेष दिवशी जवानांची उपस्थिती ही केवळ धार्मिक सहभाग नव्हे, तर गोदावरी तीरावर भारतीय संस्कृती, अध्यात्म व देशसेवेचा संगम असल्याची जाणीव सर्वांनाच झाली. यावेळी चार्टर्ड अकाउंटंट ओम पंडित त्यांच्यासमवेत उपस्थित होते. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे कार्यवाह जयंत गायधनी यांनी आरती समितीच्या विविध उपक्रमांची व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती गोपाल कृष्णन यांना दिली.
समितीचे उपाध्यक्ष प्रभू नरसिंह कृपादास यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करताना या उपक्रमाचे महत्त्व उलगडून सांगितले. समितीचे वरिष्ठ सदस्य शिवाजीराव बोंदार्डे यांनी स्मृतिचिन्ह, वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन गोपाल कृष्णन यांचा सन्मान केला. सचिव मुकुंद खोचे यांनी समितीच्या वार्षिक उपक्रमांची माहिती देत उपस्थित मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
संघाचे अ. भा. सहसरकार्यवाह गोपाल कृष्णन यांची उपस्थिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह गोपाल कृष्णन यांची बुधवार, (दि.13) रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या नित्य महाआरतीत विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले की नदीच्या सर्वांगीण विकासासाठी, तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक तेज पुन्हा उजळविण्यासाठी अशा उपक्रमांची आज अत्यंत गरज आहे. गोदावरी आरतीसारख्या उपक्रमांचा आरंभ यापूर्वीच व्हायला हवा होता. मात्र, देशभरात सध्या जे हिंदू समाजाचे एकीकरण घडत आहे, त्या प्रक्रियेमध्ये गोदावरी महाआरतीचे योगदान हे अतिशय मोलाचे आणि प्रेरणादायी आहे.