कृषी विकासासाठी ‘महाअ‍ॅग्री एआय’ ठरणार उपयुक्त

मुख्यमंत्री फडणवीस : एआय समीटमध्ये महाराष्ट्राचा डंका

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 20) येथे सांगितले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने व चर्चेपुरती मर्यादित न राहता ती लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समीट-2026 मधील ’एआय इन अग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे. अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिकापार पाडू शकते, असे सांगून फडणवीस म्हणाले, जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळ आर्थिक विषयाशी निगडित नाही. कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे. देवेश चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे या एआय क्षेत्रातील योगदानासाठी आणि टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी कौतुक केले. सौम्या स्वामिनाथन यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजगता यावी यावर भर दिला. अंतिमतः शेतकर्‍यांनी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केल्यानेच यश मिळाले. यामुळेच या क्षेत्रातील बदलात महिला शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कृषि सचिव विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागात राबवित असलेल्या डिजिटल तसेच एआय संबंधित विविध प्रकल्पांची त्यांनी
माहिती दिली.

‘MahaAgri AI’ will be useful for agricultural development

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *