कुंभ यशस्वी करण्याची विभागीय आयुक्तांची ग्वाही
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आला असून शुक्रवारी (दि.28) विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी जलज शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर व अन्य शासकीय विभागांच्या अधिकार्यांनी त्र्यंबक येथील आखाड्यांच्या महंतांची भेट घेत सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील अभिप्राय व मागण्यांबाबत चर्चा केली.
सिंहस्थ कुंभमेळा 2026-27-28 चा ध्वजारोहण समारंभ 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. सिंहस्थाला केवळ 12 महिने शिल्लक असल्याने विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावी असे आदेश शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून विभागीय आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचे नियोजन सुरु आहे. अलिकडेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कामांचा आढावा घेत पावसाळा संपला की विकासकामांना त्वरीत सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार जिल्हा प्रशासनाकडून युध्दपातळीवर हालचाली गतिमान करण्यात आल्या असून त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी (दि.28) विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस विभाग आणि अन्य शासकीय अधिकार्यांनी त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकेश्वर येथील महानिर्वाणी, आनंद, बडा उदासीन, नया उदासीन, निर्मल ,अटल, जुना आखाडा, निरंजनी, आवाहन व अग्नी या दहा शैव आखाड्यांना भेट देऊन आखाड्याच्या महंतांशी त्यांचे अभिप्राय व मागण्या याबाबत चर्चा केली. याप्रसंगी स्वामी शंकरानंद सरस्वती व अन्य आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित साधुमंतांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांच्या अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त केल्या.
महंतांकडून आखाड्यांकडे जाणारे रस्ते, आखाड्यांना आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा विद्युत पुरवठा व साधूंच्या निवासाबाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या. साधू, महंत, आखाडे, तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित आणि स्थानिक नागरिक आणि भाविक यांच्या सहकार्याने येणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि आनंददायी करण्याचा विश्वास यावेळी डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त यांनी व्यक्त केला.