मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीयमंत्र्यांची उपस्थिती
नाशिक : प्रतिनिधी
भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन दिनांक 29 ते 31 ऑगस्ट रोजी शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ’ढगातळी आसन ’ या स्थानावरील मंदिराचे उदघाटन देखील होणार आहे. समारंभ देखील या निमित्त होणार आहे.
या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शनाचे आयोजन केलेले आहे.
या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधक वृंद उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनप्रसंगी प.पू.बिडकर बाबा, प.पू. लोणारकर बाबा, प.पू..खामणीकर बाबा, प.पू.विध्दांस बाबा, प.पू.कारंजेकर बाबा, प.पू.लासुरकर बाबा यांची उपस्थिती लाभणार आहे. संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ना. चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे, भारती पवार, ना.भागवत कराड, शरद ढोले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, श्रीकांत भारतीया, जितुभाई चौधरी, जयकुमार रावल,अविनाश ठाकरे खासदार श्रीमती कमलाबेन डेलकर आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून डोंगरे वस्तीगृहावर भव्य डोम उभारण्यात येत आहे या संमेलनानिमित्त विविध धार्मिक वस्तूंचे स्टॉल तसेच धार्मिक पुस्तकांचे स्टॉल आणि पूजेच्या साहित्याची दुकाने देखील थाटण्यात येणार आहेत.
संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन प. म सुकेणेकर बाबा , महंत चिरडे बाबा, कृष्णराज बाबा मराठे, माजी आमदार बाळासाहेब सानप, दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश शेठ घुगे, प्रकाश शेठ ननावरे , प्रभाकर भोजने, अरुण महानुभव, विश्वास का. नागरे आदींनी केले आहे.
संमेलनात मांडण्यात येणारे ठराव
भरवस (भडोज गुजरात राज्य ) येथील चक्रधर स्वामींची जन्मभूमी (विशाल देव राजांचा राजवाडा ) महानुभाव अनुयायांना दर्शनासाठी मुक्त करणे.
मराठीचे आद्य उद्गाते श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी मिळणे.
श्री चक्रधर स्वामींचे प्रमुख तीर्थस्थान श्री क्षेत्र जाळीचा येथे प्रतिवर्षी शासकीय महापूजा होणे.
महाराष्ट्रातील श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थ स्थानांची शासन दरबारी शासनाद्वारे नोंद होणे.
महानुभाव संप्रदायी संत व भाविकांसाठी प्रत्येक गावात दफन विधीसाठी जागा मिळणे.
मराठी भाषेच्या विकास व समृद्धीसाठी श्री क्षेत्र वृद्धीपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ मान्यता देणे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अष्टशताब्दी जन्मोत्सव शासन दरबारी साजरा करावा.