नाशिक : प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केल्याने आता ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होता. त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर मुदत संपलेल्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्यात आलेल्या होत्या. निवडणुका लांबल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागण्याबरोबरच मतदारांना सांभाळण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेच दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे इच्छुक आता कामाला लागणार आहेत.