मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधकांनी उपस्थित केलेले विविध मुद्दे खोडून काढत त्यांनी राज्याच्या ’ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचा रोडमॅप सभागृहासमोर मांडला. विरोधकांच्या टीकेला सांख्यिकीय पुराव्यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. महाराष्ट्र हे वेगळे राष्ट्र असते, तर आपली अर्थव्यवस्था जगात तिसावी असती. पहिल्या 35 देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपीन्स, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांनाही मागे टाकत मोठी अर्थव्यवस्था उभी केली आहे. पुढील दोन-तीन वर्षांत यूएई आणि सिंगापूर यांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू.
निधीवाटपात भाजपला झुकते माप मिळाल्याच्या आरोप जयंत पाटील यांनी केला. अर्थसंकल्पातील विभागनिहाय तरतुदी पाहता, 59 टक्के निधी भाजप, 22 टक्के शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना केवळ 19 टक्के निधी मिळाल्याची टीका पाटील यांनी केली. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील आकडेवारीच मांडली. ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रिपद असलेल्या शिवसेनेला (एकत्रित) केवळ 16 टक्के निधी मिळाला होता, तर राष्ट्रवादीने 57 टक्के स्वतःकडे ठेवला. काँग्रेसला 26 टक्के निधी देण्यात आला. त्यामुळे निधी हा खातेनिहाय मिळतो, पक्षनिहाय नाही, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
अर्थव्यवस्थेत 7.9 टक्के दराने वाढ
मुख्यमंत्री म्हणाले, 2013-14 मध्ये राज्याचा एकूण जीडीपी 16 लाख कोटी रुपये होता, तो गेल्या 10 वर्षांत 51 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा तीनपट विस्तार आमच्या कार्यकाळात झाला. राज्याची अर्थव्यवस्था सध्या 7.9 टक्के दराने वाढत असून दरडोई उत्पन्न 3 लाख 17 हजार रुपयांवरून 3 लाख 47 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर असला, तरी लोकसंख्या आणि जीएसडीपीचा विचार केला तर राज्य अव्वल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यावरील कर्ज 9.32 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळताना फडणवीस म्हणाले की, उत्पन्नातील वाढ जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहे. राज्याचे कर्ज-उत्पन्न गुणोत्तर सध्या 18.2 टक्के असून पुढील वर्षी ते 20 टक्क्यांपर्यंत जाईल असे अनेकांनी सभागृहात सांगितले. परंतु, ती मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची खबरदारी सरकार घेत आहे.राज्याला 2013-14 मध्ये 13 हजार 241 कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान मिळत होते, ते आता 68 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून यात पाचपट वाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यावर 9.32 लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याने महाराष्ट्र दिवाळखोरीच्या वाटेवर आहे, असा आरोप उबाठा गटाच्या सुनील प्रभू यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मी सुनील प्रभूंचे निवडणुकीचे शपथपत्र वाचले. त्यात त्यांची संपत्ती 14 कोटी आहे आणि दायित्व 3 कोटी 54 लाख. त्यांच्या मालमत्तेच्या तुलनेत दायित्वाचे प्रमाण 25.28 टक्के असल्याचे सांगत राज्यावरील दायित्व 18 टक्के असल्याने त्यावरून राज्याला कर्जबाजारी म्हणणे योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.
आर्थिक शिस्त राखली जाईल
राज्यातील जलसिंचन क्षमता सध्या 81 लाख हेक्टर असून, नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यात आणखी वाढ होईल. ऊर्जा क्षेत्रात अर्थसंकल्पीय तरतुदींव्यतिरिक्त सुमारे तीन लाख 12 हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम असल्याचे मी म्हणणार नाही. परंतु अडचणीच्या परिस्थितीत मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्राकडे आहे. दिवंगत अजित पवार यांनी राज्याची आर्थिक शिस्त राखली होती. त्याचप्रमाणे पुढेही आर्थिक शिस्त राखली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra is the country’s first trillion dollar economy
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…