नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच धुरंधर

शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार मुसंडी; भाजपा दुसर्‍या, तर राष्ट्रवादी तिसर्‍या स्थानी

भगूर, इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सत्तेला सुरूंग
सटाणा, चांदवड, पिंपळगाव, ओझरमध्ये भाजपाची सरशी

प्रमुख पराभूत
संजय इंदुलकर, अनिता करंजकर, योगिता मोरे, भास्कर बनकर, कैलास घुले
सुनील मोरे, रुपेश दराडे, हेमंत वाजे.

सटाण्यात एक दाम्पत्य पराभूत, दुसरे विजयी

सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे नगरसेवक पदासाठी तर त्यांच्या पत्नी योगिता मोरे या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला.तर शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हर्षदा पाटील या विजयी झाल्या तर त्यांचे पती राहुल पाटील यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजय मिळविला.

भगूरमध्ये तीन दाम्पत्य विजयी

भगूर पालिकेत तीन दाम्पत्य तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवित होते. आणि विशेष म्हणजे तिन्ही दाम्पत्याने विजय मिळविला. त्यामुळे सभागृहात मिस्टरांबरोबरच होममिनिस्टरही पालिकेत निवडून गेले आहेत. नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे या आणि त्यांचे पती विशाल बलकवडे हे दोघेही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आले. तर त्यांच्याच कुटुंबातील दीपक बलकवडे आणि विद्या बलकवडे हे दोघे भाजपाकडून विजयी झाले. तर उबाठाकडून जयश्री देशमुख आणि काका देशमुख हे विजयी झाले. भगूरच्या इतिहासात तीन दाम्पत्य एकाच वेळी निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. महायुतीमध्येच खर्‍या अर्थाने निवडणुकीचा सामना रंगला. महाविकास आघाडीत सिन्नरचा अपवाद वगळता इतर ठिकाणी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. महायुतीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक पाच नगराध्यक्ष विजयी झाले. तर नगरसेवक पदाच्या तब्बल 90 जागा मिळवत मिळवत क्रमांक एक मिळविला. त्याखालोखाल तीन ठिकाणी नगराध्यक्षपदासह 68 नगरसेवक निवडून आणत भाजपा दुसर्‍या स्थानावर आणि तीन नगराध्यक्ष व 62 नगरसेवकांसह राष्ट्रवादी अजित पवार गट तिसर्‍या स्थानावर राहिला. या निवडणुकीत अनेक सत्ताधार्‍यांना मतदारांनी घरी बसवत परिवर्तन घडवून आणले. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपा तर इगतपुरीमध्ये माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि भगूरमध्ये शिंदे गटाचे करंजकर यांची सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. जिल्ह्यात एकूण अकरा नगरपरिषदांसाठी दि. 2 आणि 20 डिसेंबरला मतदान झाले होते. नगराध्यक्षपदाच्या अकरा जागांसाठी 53 तर नगरसेवक पदाच्या 264 जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात होते. काल सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. येवल्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा युतीने शिंदे गटाला धोबीपछाड दिला. येवल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद लोणारी यांनी शिंदे गटाचे रुपेश दराडे यांचा पराभव केला. भगूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता भोगणार्‍या करंजकरांच्या सत्तेला अजित पवार गटाने सुरुंग लावला. येथे राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांनी बाजी मारत विद्यमान नगराध्यक्षा अनिता करंजकर यांचा पराभव केला. इगतपुरीमध्ये उबाठामध्ये असलेले माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. मात्र, तब्बल तीस वर्षांपासून त्यांच्या एकखांबी नेतृत्वाला शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेत जबर दणका दिला. भाजपाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. तर संजय इंदुलकर यांना पराभव पत्करावा लागला. येथे शिंदे गटाच्या शालिनी खताळे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्र्यंबकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची सत्ता शिंदे गटाने उलथवत नगराध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार यांनी बाजी मारली. सटाण्यात भाजपाच्या उमेदवार योगिता मोरे यांना त्यांच्याच पक्षाच्या अपक्ष बंडखोरी केलेल्या रुपाली कोठावदे यांच्यामुळे फटका बसल्याने पराभव पत्करावा लागला. येथे शिंदे गटाच्या हर्षदा पाटील या विजयी झाल्या. येथे जातीय समिकरणे प्रभावी ठरली. जरांगे फॅक्टर येथे चालल्याची वदंता आहे. नांदगावमध्ये शिंदे गटाचे सागर हिरे तर मनमाडमध्ये योगेश पाटील यांनी बाजी मारली. येथे भुजबळांनी मोठी ताकद वापरली होती. मात्र, त्यांना दोन्ही ठिकाणी यश मिळाले नाही. सिन्नरमध्ये चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेमंत वाजे यांना भाजपाने पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. मात्र त्यांना मतदारांनी थेट चौथ्या क्रमांकावर फेकले. येथे अजित पवार गटाचे विठ्ठलराजे उगले विजयी झाले. पिंपळगाव बसवंत येथे आ. दिलीप बनकर यांना होमपीचवरच जबर धक्का बसला. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कट्टर विरोधक असलेल्या भास्कर बनकर यांच्याशी जुळवून घेत निवडणुकीत रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोबतीला तानाजी बनकर यांनाही घेतले. मात्र, भाजपाच्या सतीश मोरे आणि शिंदे गटाचे राजेश पाटील यांनी अतिशय मुत्सद्दीपणाने तिन्ही बनकरांना अस्मान दाखवित सत्ता मिळविली. अशीच परिस्थिती ओझर नगरपरिषदेतही राहिली. येथे माजी आमदार अनिल कदम यांनी त्यांचेच चुलत भाऊ भाजपाचे जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांच्या विरोधात निवडणुकीत आव्हान दिले. परंतु भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता घेगडमल यांनी बाजी मारली. नगरसेवक पदातही भाजपाचेच सर्वाधिक उमेदवार ओझर आणि पिंपळगाव बसवंत येथे निवडून आल्यामुळे यतिन कदम यांचे हौसले बुलंद झाले आहेत.

Mahayuti is strong in the municipal council elections.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *