महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अपक्षांचेेही आव्हान

भुयारी गटार, पाण्याच्या प्रश्नासह विकासाच्या व्हिजनवर कोणाचा शिक्कामोर्तब?

चांदवड नगरपरिषदेची निवडणूक तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असल्याने, शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मागील कार्यकाळात भारतीय जनता पक्षाकडे असलेली सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे, तर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यंदा नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी घोषित झाल्यामुळे या पदासाठी सर्वच पक्षांतून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आमदार डॉ. राहुल आहेर आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या समर्थकांमध्ये सक्रियता वाढली आहे, तर बंडखोरीची तयारी करणार्‍या इच्छुकांचे गणित पूर्णपणे
बिघडले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर आणि माजी आमदार शिरीष कोतवाल आता भाजपच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. यामुळे भाजपमध्ये वर्चस्वाचा संघर्ष संपला असून, आता दोघेही संयुक्तपणे महायुतीला विजयी करण्याचे आव्हान स्वीकारतील. भूषण कासलीवाल हेदेखील या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण (अनुसूचित जाती) असल्याने ते आता नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक लढवणार नसले, तरी ते नगरसेवकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांचा सहभाग आणि त्यांची भूमिका प्रभागस्तरावर राजकीय समीकरणे बदलू शकते. अनेक प्रभागांत तिकीट न मिळालेले इच्छुक अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता असल्याने, ते दोन्ही आघाड्यांसाठी मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

गतिमान आणि पारदर्शक चांदवड
“विश्वासाने सेवा आता अधिकाराने विकास”; पहिले 100 दिवसांचे लक्ष्य : शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवून खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुशेष पूर्ण करणे. जलद तक्रार निवारण कक्ष सक्रिय करणे. पायाभूत सुविधा : सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे दर्जेदार पक्क्या रस्त्यांमध्ये रूपांतरण. भूमिगत गटार योजनेतील त्रुटी सुधारून वैज्ञानिक ड्रेनेज व्यवस्था लागू करणे. स्मार्ट सुविधा : शहरातील गल्ली-गल्लीत स्मार्ट एलईडी पथदीप बसवून सुरक्षितता वाढवणे. पारदर्शक प्रशासन : प्रत्येक दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणे. घरकुल, पेन्शन, रेशनसारख्या शासकीय योजनांसाठी शून्य प्रलंबित धोरण लागू करणे. सामाजिक विकास : प्रत्येक प्रभागात उद्याने, नाना-नानी पार्क आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका उपलब्ध करून देणे.
-राजेंद्र (राजाभाऊ) आहिरे

आरोग्यसंपन्न आणि पर्यटनकेंद्रित चांदवड
“जनतेचा सहभाग जनतेचा विकास“, सार्वजनिक आरोग्य : फिरता दवाखाना सुरू करणे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक व स्थानिक लोकांना दाराजवळ आरोग्य सेवा मिळेल. संसर्ग नियंत्रण : डास व किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेमार्फत नियमित औषध फवारणीचे विशेष पथक तातडीने कार्यान्वित करणे. पर्यटन आणि रोजगार : चांदवडचा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे. युवा सक्षमीकरण : तरुणांना शारीरिक आणि मानसिक सुदृढता मिळावी यासाठी प्रत्येक प्रभाग क्षेत्रात व्यायामशाळा, अभ्यासिका आणि खेळाचे मैदान निर्माण करणे. मूलभूत गरज : खड्डेमुक्त रस्ते आणि कॉलनी व वसाहतींमधील पक्क्या रस्त्यांचा अनुशेष भरून काढणे.
-मनोज बांगरे

सर्वसमावेशक विकास आणि गतिमान प्रशासन
“चांदवडकरांच्या विश्वासाने, चांदवडच्या विकासाकडे!” सहा महिन्यांत पूर्णत्वास : नळयोजना, रस्ते काँक्रिटीकरण, सार्वजनिक शौचालये आणि बाजारपेठ सौंदर्यीकरणाची सर्व रखडलेली कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धार. समान विकास : मागासलेल्या भागांतील विकासाची कामे प्राधान्याने पूर्णत्वास नेणे. 247 पाणीपुरवठा यंत्रणा उभारणे. नागरिक सुविधा : शहरात एक ‘आधुनिक गार्डन आणि वेलनेस पार्क’ उभारणे. रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था आणि बाजारपेठेचे सौंदर्यीकरण त्वरित पूर्ण करणे. महिला सुरक्षा : महिलांसाठी ‘महिला सुरक्षा केंद्र’ व हेल्पलाइन त्वरित सुरू करणे आणि शहरात सीसीटीव्ही नियंत्रण प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणे. शिक्षण : युवकांसाठी ‘अभ्यासिका केंद्र’ उभारून स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करणे.
– विकी जाधव

नागरिकांच्या अपेक्षा, मागण्या

शहरातील रस्ते त्वरित दर्जेदार करावेत. कॉलनी व वसाहतींमध्ये तातडीने पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण करावे. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी स्वच्छतेला
सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि नियमित औषध फवारणीची मागणी पूर्ण करावी. शहराच्या सुरक्षेसाठी मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. प्रत्येक कॉलनीमध्ये पुरेसे पथदीप (स्ट्रीट लाईट) बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षितता सुनिश्चित करावी. नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रभागात अभ्यासिका व व्यायामशाळा उभाराव्यात. प्रलंबित पाणी आणि गटार योजनांना गती देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. शहराचा विकास आराखडा तयार करताना स्थानिक अनुभवी स्थापत्य अभियंत्यांचा सहभाग घेऊन नियोजन अधिक त्रुटीरहित करावे.

विविध समस्या

पाच वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने, शहरात मूलभूत सुविधा आणि विकासकामांचा मोठा अनुशेष आहे. भुयारी गटार योजनेचा बोजवारा, योजनेचे काम अतिशय धीम्या गतीने, शहराच्या अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. शहरातील अनेक कॉलनी आणि वसाहतींमध्ये आजही पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. पावसात चिखलाचे साम्राज्य आणि उन्हाळ्यात धूळ अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच आहे. प्रभागांमधील गटार आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसणे ही प्रमुख समस्या आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *