नाशिकमध्ये ’महिंद्रा’चा नवीन मेगा प्रकल्प

ना. उदय सामंतांची निमात घोषणा

नाशिक : प्रतिनिधी
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी नाशिकला जागेची मागणी केली आहे. यासंदर्भात उद्योग विभाग सकारात्मक असून, जागासुद्धा निश्चित केली आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निमा सभागृहात आयोजित संवाद बैठकीत केली. उद्योजकांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले. निधीअभावी नाशिक जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प व सुखसुविधा रखडणार नाही, असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत व्यासपीठावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषधेमंत्री नरहरी झिरवळ,निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आ. सीमा हिरे, आ. हिरामण खोसकर, आ. सरोज अहिरे, आ. दिलीप बनकर, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, लघुभारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र अहिरे आदी होते.
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात नाशिकला औद्योगिक क्षेत्रात सर्वांना बरोबर घेऊन उंच शिखरावर नेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र व्हावे, सीईपीटी प्रकल्प लवकर साकारावा, नाशकात मोठ्या प्रमाणात मेगा प्रोजेक्ट यावेत, सीपीआरआय लॅब कार्यान्वित व्हावी, ड्रायपोर्ट प्रकल्प राबविण्यात गती यावी व नाशकात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनी प्रयत्न करावेत, आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी एमआयडीसीचे संतोष भिसे, बाळासाहेब झांजे,विनोद राक्षे, दीपक पाटील, जयंत पवार आदी अधिकारी उपस्थित होते. संवाद बैठकीस चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, ज्ञानेश्वर गोपाळे,वरूण तलवार, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील,किरण जैन,कैलास पाटील,वैभव नागसेठीय,मिलिंद राजपूत,श्रीकांत पाटील,नितीन आव्हाड,नानासाहेब देवरे,जयंत पगार,गोविंद बोरसे आदींसह उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साडे तीनशे एकर जागेसाठी महिंद्राचा होकार
यावेळी ना.सामंत यांनी महिंद्रा कंपनीचे जागा वाटप प्रक्रियेचे पत्र निमा अध्यक्ष आशिष नहार यांना सुपूर्त केले. महिंद्राला त्यांच्या प्रकल्पासाठी जी जागा देत आहोत त्याने कुणाचीही नुकसान होणार नाही, असे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले. महिंद्राने प्रकल्पासाठी पाचशे एकर जागा मागितली होती व प्रकल्प टाकण्याची त्यांनी तयारी दर्शविली होती. परंतु आता या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात मिळालेली साडे तीनशे एकर जागेसाठी महिंद्राने होकार दिला आहे, याचा उल्लेख ना. सामंत यांनी केला. नाशकात कायमस्वरूपी केंद्र व्हावे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. तपोवनात कुंभमेळा भरतो त्या ठिकाणी भिंत नसलेले प्रदर्शन केंद्र उभारले जाईल.अकरा वर्षे प्रदर्शन केंद्र असेल आणि एक वर्ष कुंभमेळा येथे भरेल. लवकरच या कामाचे टेंडर
निघेल असे ते पुढे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *