नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
वयोवृद्ध महिलेच्या घरात काम करणार्या मोलकरणीने घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बोधलेनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नितीन बाळकृष्ण रोठे (रा. श्यामतीर्थ अपार्टमेंट, बोधलेनगर, नाशिक) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची वयोवृद्ध आई बोधलेनगर येथील शीतलधारा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असून, त्यांच्या घरात इंदू सोनवणी नावाची महिला मोलकरीण म्हणून काम
करत होती. या मोलकरणीने घरातील 20 ग्रॅम वजनाचे सुमारे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, 15 ग्रॅम वजनाचा 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल, तीन ग्रॅम वजनाचे 12 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स तसेच सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड असा एकूण 4 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, फिर्यादीची आई वयोवृद्ध असल्याची जाणीव असूनही आरोपी मोलकरणीने त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम स्वतःच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर केल्याचेही उघड झाले आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घडला.
Maid's hand cleaning; theft case registered