वीजपुरवठा सुरळीत करा अन्यता आंदोलन
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेसचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून लग्न सराई व विविध धार्मिक कार्यक्रम सुरु झालेले आहेत. परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सामान्य नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. वांरवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतांना यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले कीं , रविवार कारंजा विभागातील रविवार कारंजा, रेडक्रॉस, फावडे लेन, मेनरोड, शालिमार, धनकर लेन, अशोक स्तंभ या परिसरातील विदयुत पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून वारंवार खंडित होत आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून शहराचे तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त असते, यामुळे शहरात प्रचंड उन्हाळा जाणवत असून या मुळे नागरिक हैराण झालेले आहेत. यातच रविवार कारंजा परिसरातील वीज पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून वारंवार खंडित होत आहे, काही दिवसापासून तर या परिसरात चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित होत आहे.
रविवार कारंजा हा परिसर व्यापारी पेठ म्हूणन प्रसिद्ध असून या ठिकाणी शहर जिल्ह्यातील नागरिक खरेदी-विक्री साठी मोठ्या प्रमाणात येत असतात, परंतु वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्या मुळे व्यापारी वर्ग हैराण झाला असून याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही होत आहे, सततच्या खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर हैराण झालेले आहे.
तरी कृपया याची गंभीरतेने दखल घेऊन रविवार कारंजा, रेडक्रॉस, फावडे लेन, मेनरोड, शालिमार, घनकर लेन, अशोक स्तंभ या परिसरामध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबविण्यात येऊन नागरिकांना व व्यापार्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा महावितरणच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.