मालेगावात एकात्मता चौकात शेतकऱ्यांचे आंदोलन

 

 

मालेगावी एकात्मता चौकात शेतकऱ्यांचे आंदोलन

मक्याचे भाव घसरल्याने शेतकरी रस्त्यावर

मालेगाव(Malegaon): प्रतिनिधी

अतिवृष्टीने संकटांचा सामना करत शेतकरी मेटाकुटीला आला असताना मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मका दरात अचानक भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झाले असून बाजार समितीच्या समोर एकात्मता चौकात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावात  १७५०  प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला मका दुपारच्या लिलाव सत्रात व्यापाऱ्यांनी  अवघ्या १२००  ते १३००  प्रतिक्विंटल खरेदी केला  होता.यामुळे संतप्त झालेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांनी  लिलाव बंद पाडत बाजार समितीसमोर एकात्मता चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

बाजार समितीचे सचिव अशोक देसले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भिका कोतकर कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून व सकाळचा सत्रातील योग्य दर दिले जातील असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले.

यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली होती. येथील बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार  मका खरेदी केला जात नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांचे  आर्थिक नुकसान केले जात असून सकाळच्या सत्रात सतराशे पन्नास ते सतराशे रुपये  प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा मका दुपारच्या सत्रात भाव पाडून खरेदी करण्यात आला .तब्बल चारशे रुपये  कमी दर मिळत असल्याचे तालुक्यातील गाळणे येथील सोनलाल दिवे या मका उत्पादक शेतकऱ्याने  सांगितले.

हेही वाचा: बाजार समित्यांमध्ये पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क

संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले होते यामुळे कॅम्प रोडवरील  एकात्मता चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. बाजार समितीचे सचिव देसले यांच्यासह व्यापाऱ्यांनी बाजार भावाप्रमाणे दर दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छायाचित्र:

मालेगाव कृषी उत्पन्न समितीत मक्याला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ एकात्मता चौकात आंदोलन करताना शेतकरी.

हेही वाचा : कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *