माणिकरावांची अचूक बोली, राजाभाऊ गाठणार दिल्ली !
सिन्नर ः संदीप ठोक
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक प्रमोद चोथवे यांच्यासह इतर कार्यकर्ते चर्चा करत असताना आमदार माणिकराव कोकाटे यांचे आगमन झाले अन् कार्यकर्त्यांची बोलताना तुमचं बरं आहे बुवा, आता तुम्हाला दिल्लीचा मार्ग मोकळा झाला असे अवचित बोलून गेले आणि संपूर्ण तालुक्याच्या सोशल मीडियावर त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्याला जोडूनच वाजे खासदार तर कोकाटे आमदार हा फोटो सिन्नरच्या राजकारणात चर्चेला आला आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला अन् महाविकास आघाडीकडून अनपेक्षितपणे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचा विचारही मनात नसताना उमेदवारी जाहीर झाली. सिन्नर तालुक्याला पहिल्यांदाच पक्षीय उमेदवारी मिळाल्याने, स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपसात मतभेदांना तिलांजली दिल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या नाशिक लोकसभा आणि सिन्नरची राजकीय भूमी बदलण्यास महत्वपूर्ण ठरली. याउलट महायुतीमध्ये तिकीट वाटपाच्या घोळामुळे झालेला उशीर महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत संभ्रमात ठेवणारा ठरला. शेवटच्या टप्यात गोडसेंचे नाव निश्चित झाले, तोपर्यंत महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मिळालेल्या अवधीत त्यांच्या सिन्नरमधील कार्यकत्यांनी घरोघरी, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रचार केला. परिणामी सिन्नरकरांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे वातावरण तयार झाले. दुसरीकडे उशिरा तिकीट जाहीर झाल्याने प्रचारात मागे पडलेले हेमंत गोडसे यांना महायुतीअंतर्गत असलेल्या नाराजीचा सामना करावा लागला. तिकीट वाटपाच्या घोळामुळे नाराज झालेले ना, छगन भुजबळ, तसेच, गोडसे यांनी तालुक्यात निधी व विकासकामात दखल दिल्याने नाराज असलेले आ. माणिकराव कोकाटे यांची मनधरणी खुद्द मुख्यमंत्र्यांना करावी लागली. त्यानंतर आ. कोकाटे यांनी शेवटच्या चार दिवसांत सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. मात्र, आ. कोकाटे यांनीही स्थानिक उमेदवार असल्याने आपली भूमिका सॉफ्ट ठेवल्याचे बोलले जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इतर पाच विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सिन्नरकरांनी उस्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत भाग घेतल्याने मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 5 टक्क्यांनी वाढला आहे. त्यातच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या केवळ प्रचार कार्यालयाचा शुभारंभ वगळता शहर आणि तालुक्यात प्रचारासाठी आमदार कोकाटे फिरकले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीही त्यातून योग्य तो अर्थ काढल्याचे मतदानाच्या दिवशी महायुतीच्या उमेदवाराच्या ओस पडलेल्या बुथ वरून दिसून आले. निवडणुकीच्या काळात महायुतीकडून तालुक्यातील भाजपा नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा राबविली. नाराज असलेल्या ना. भुजबळांनी महाविकास आघाडीला सहानुभूती मिळत असल्याचे वक्तव्य केल्याने त्यांच्याशी संलग्नित असलेल्या इथल्या समता परिषदेने महाविकास आघाडीला मदत केल्याचीही चर्चा आहे. एकंदरीत सिन्नर मतदार संघाच्या प्रचारात आघाडीत एकजूट तर महायुतीच्या प्रचारात असमन्वय, अविश्वास आणि विस्कळीतपणा दिसून आला.
स्थानिक उमेदवार असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी मतदानासाठी दाखवलेली उस्फूर्तता आणि आक्रमक आमदार कोकाटे यांनी राखलेला ’संयम’ वाजेंना दिल्लीकडे कुच करण्यात सहाय्यभूत ठरेल, अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेला हा संवाद वाजे – कोकाटे मनोमिलनाची नांदी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
उदय सांगळेंची तटस्थ भूमिका
सुरुवातीच्या राजकीय प्रवासापासून राजाभाऊ वाजे यांच्या खांद्याला खांदा लावून फिरणारे व नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बाजार समितीच्या प्रत्येक निवडणुकीत साथ देणारे उदय सांगळे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोठेही दिसून आले नाहीं. सुमारे दोन वर्षांपासून उदय सांगळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जवळीक ठेवताना दिसून आले होते. वाजे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सांगळे यांनी खासदार गोडसे यांचा प्रचार करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, अचानक वाजे यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आणि सांगळे यांची अडचण झाली. त्यामुळे सांगळे यांनी वाजे किंवा गोडसे या कोणाच्याही प्रचारात सक्रिय न होता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
लाखाचे लीड ठरणार निर्णायक
गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेल्या माणिकराव कोकाटे यांना 91 हजार तर राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे सोबत असल्यामुळे हेमंत गोडसे यांना 54 हजारावर मते मिळाली होती. यावेळी वाजे विरोधी उमेदवार झाले. दुसरीकडे कोकाटेंचीही गोडसेंवर नाराजी होती. त्यामुळे यंदा गोडसेंना 50 हजारा पर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यातच बाबाजी परिवार ही बर्यापैकी मतदान घेणार आहे. असे झाले तरी वाजेंचे मताधिक्य लाखावर राहण्याची शक्यता आहे. हेच मताधिक्य त्यांना विजयश्री खेचून आणण्यात सहाय्यभूत ठरेल, असे बोलले जात आहे.
सिन्नरला सर्वाधिक मतदान
सिन्नर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 533 मतदारांपैकी तब्बल 2 लाख 13 हजार 45 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 1 लाख 17 हजार 278 पुरुष आणि 95 हजार 767 महिलांचा समावेश आहे. एकूण 69.50 टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभेच्या तुलनेत हे मतदान तब्बल 5 टक्के अधिक आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…