ओझरमध्ये मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

नगरपरिषदेतर्फे नायलॉन मांजा वापर, विक्रीवर कडक बंदी

ओझर : वार्ताहर
येत्या मकरसंक्रांतीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ओझर नगरपरिषदेने शहरात नायलॉन मांजा, चिनी मांजा तसेच धातूचा अंश असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांजाच्या वापर, साठा आणि विक्रीवर कडक बंदी लागू केली आहे. नगरपरिषद व पोलिस प्रशासनातर्फे संयुक्तरीत्या ओझरमध्ये पुन्हा तपासणी मोहीम राबविली. यामुळे मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना जीवघेण्या मांजाचा वापर टाळून सुरक्षितरीत्या उत्सव साजरा व्हावा, यासाठी ओझर नगरपरिषद व पोलिस प्रशासनातर्फे संयुक्तरीत्या मांजा विक्रेत्यांची कसून तपासणी केली जात आहे. मुख्याधिकार्‍यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक प्रतीक उंबरे यांच्यासह नीलेश डेंगळे, मनोहर जाधव, बाळू निकम, सुनील कवटकर, पोलिस हवालदार नियाज शेख, पंकज दोंदे यांनी ओझर शहरातील विविध दुकानांवर तपासणी मोहीम राबवली. नायलॉन मांजाच्या तीक्ष्णतेमुळे मोटारसायकलस्वार, पादचारी, तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणार्‍या या मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात घडल्याचे उदाहरणे समोर आले आहे. अशा धोकादायक साहित्याचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. अलीकडे शहरातील काही भागांमध्ये प्रतिबंधित मांजाची चोरीछुपे विक्री व साठा केल्याचे समजताच नगरपरिषद व पोलिस प्रशासनातर्फे तपासणी केली. यापुढेही कोणत्याही क्षणी अचानक तपासणी केली जाणार असून, मांजा आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

ओझरला दुचाकीस्वार जखमी

नाशिककडून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने दुचाकीवरून जाणार्‍या मोहित राजेंद्र भावसार (वय 22) आईला घेऊन (रा. पिंपळगाव बसवंत) जात असताना त्यांना नायलॉन मांजामुळे जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. नायलॉन मांजामुळे हा दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. मात्र, मांजा थेट गळ्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना ओझर नवीन बसस्थानक परिसरात घडली. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस प्रशासन व ओझर नगरपरिषदेकडे कडक कारवाईची मागणी
झाली होती.

Manja vendors' dhabas were heard in Ozar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *