कामानिमित्त सोलापूरला पाच वर्ष राहण्याचा योग आला. या अपरिचित शहरातील अनेक प्रसिद्ध गोष्टी माहिती झाल्यात. सिद्धरामेश्वरांच्या पावन भूमीत बऱ्याच वेळा भगवंताच्या अनुभूतीची जवळुन प्रचिती आली. मनाला दिपवून टाकणारी, मनाला शांती देणारी अनेक शिवालय सोलापूर मध्ये खूप प्रसिद्ध आहे.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनात अढळ स्थान निर्माण करणारा श्री आजोबा गणपती, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री हिंगुल अंबिका मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री रुपाभवानी मंदिर आणि वीर तपस्वी मंदिर, बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर अशी अनेक मंदिरे सोलापूर मध्ये प्रेक्षणिय आणि प्रसिद्ध आहेत.
प्रचंड शिवभक्त असलेली सोलापूरची लोकं आपल्या वास्तूचं पावित्र्य जपताना दिसतात. घर भाड्याने देताना तर इथल्या स्थानिक नागरिकांचा पहिला प्रश्न असतो की, तुम्ही मांसाहार तर करत नाही ना? जर मांसाहारी असल्यास योग्य ती जागा इथे कितीही पैसे देऊन मिळत नाही.
खरंतर मांसाहार करणं हे अयोग्य कारण कुठल्याही पशुची हत्या केलेलं अन्न हे आपल्याला शक्ती कसे देईल? आणि सद्विवेक बुद्धी तरी कशी देईल? जिथे मासांहार शिजवलं जातं ती जागा स्मशान भूमीपेक्षा काही वेगळी नाही आणि जे ते अन्न भक्षण करतात ते दानवांपेक्षा काही कमी नाही.
शेवटी प्रत्येकाची वैचारिक धारा वेगळी असते. स्वभाव वेगळे असतात. आकलनशक्ती वेगळी असते. आपल्या आयुष्यात आपण कुणाच्या संगतीत वाढलो ती संगत ही महत्त्वाची असते. बाकी काही नाही. खरंतर सात्विकता आणि तामसिकता ही मनातूनच निर्माण होत असतात.
असो खाण्याची गोष्ट निघाल्या तर सोलापूरची कडक भाकरी, शेंगा पोळी, खवा पोळी, धपाटे आणि ठेचा तसेच शेंगा चटणी हे सुप्रसिद्ध पदार्थ आहेत. सोलापूरी खाद्य संस्कृती काही प्रमाणात वेगळी आहे. गोड पदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींसाठी हे पदार्थ न विसरण्याचा निव्वळ प्रयत्न…
सोलापूर हे चादरीसाठी ही प्रसिद्ध आहे. असंख्य चादरीचे प्रकार, रूमाल, गालीचा, कापडी पिशव्यांचे असंख्य प्रकार अशा कितीतरी गोष्टी प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन तेही अगदी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एक अतिशय वेगळी संकल्पना या सोलापूर शहराची आजही मनात निश्चलपणे घर करून आहे. माहित नाही या उपक्रमाची सुरुवात कुठल्या सामाजिक संस्थांनी केली पण सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या उपक्रमाला हे विशेष…
तो अनोखा उपक्रम म्हणजे माणुसकीची भिंत…जे नको ते देऊन जा जे हवे ते घेऊन जा… हे या माणुसकीच्या भिंतीवर लिहिलेला मनात घर करून डोक्याला विचार करायला लावणारा संदेश!!!
घरात नकळत अश्या कितीतरी गोष्टी निघतील ज्या आपण वापरत नाही, पण घरात पडुन असतात. जसे की जूनी पण न फाटलेले कपडे, जुन्या वस्तू ज्यांची गरज नसते. शक्य तर जुने कपडे निवारण कसे करायचे हाच सर्वात मोठा प्रश्न असतो. सर्वांपुढे!!!
काही लोक जुन्या कपड्यांची पायपुसनी करतात, गोधडी शिवतात. हे सगळं कितीदा करणार… कारण छोट्या मुलाच्या कपड्याचाच मोठा प्रश्न असतो. त्याच काहीच करता येत नाही कुणा दुसऱ्या गरजु मुलांना देण्याशिवाय…
माणुसकीची भिंत जवळ जेव्हा कुठली लहान मुलं आपला आनंद शोधताना दिसतात ना तेव्हा असं वाटतं
की सुख प्रत्येकाच्या नशिबात असते. काही ना रांजणभर मिळतं तर काही ना फक्त ओंजळ भर तर काही ना फक्त कणभर…पण छोट्यातल्या छोटी गोष्टीतला आनंद जो अवर्णनीय असतो तो अनुभवण्यास मिळला. तेही अगदी लहान मुलांकडून…
विपरित परिस्थितीला जे आहे ते स्विकारुन, ना कुठल्या गोष्टीची अपेक्षा, ना कुठली इच्छा फक्त आहे तो क्षण आनंदाने जगायचे. माणुसकीच्या भिंतीकडुन जे हवे ते मिळ्यानंतर त्या लहानग्यांच्या काय पण गरजवंताच्या मुखावरच सुख आणि चेहऱ्यावर जे तेज आणि आनंद असतो तो कुठल्याही श्रीमंतांला लाजवेल असा असतो.
हा उपक्रम इतका सुंदर, सुखकर आणि मनाला शांती देणारा आहे की तो मुंबई, पुणे, सोलापूर आणि नाशिक अशा मोठ्या शहरात चालू आहे. पण प्रत्येक छोट्या भागात जर हा उपक्रम सुरू केला तर अनेक हातावर जगणाऱ्या लोकांना, लहान मुलांना, गरजवंताला आनंद देईल. देणाऱ्याला ही एक प्रकारचं आत्मिक समाधान आणि आशिर्वाद देईल. कुणाच्या कामी, उपयोगी कुणी यावं याची निवड खरंतर ती ईश्वरी शक्ती करतच असते. त्या दैवी शक्तीला सर्वांचीच काळजी असते. निसर्ग फक्त कुणाला निमित्तमात्र ठरवतो. दुसऱ्या कुणाला तरी आनंद द्यायला. हेच शाश्वत सत्य!!!
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे