नाशिकरोड : वि. प्रतिनिधी
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण अगदी शेवटच्या क्षणाला केल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकरोड येथे पालिकेच्या विभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात उमेदवारांचे तुफान आल्याचे बघायला मिळाले. एबी फॉर्म मिळताच अधिकृत उमेदवारांच्या समर्थकांत जल्लोष बघायला मिळाला, तर काही इच्छुकांनी एबी फॉर्मसाठी देव पाण्यात घालूनही उपयोग न झाल्याने त्यांच्या गोटात नाराजी पसरली.
आमदार सरोज अहिरेंची खेळी
शिंदेंसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांची युती झालेली असतानाही प्रभाग 19 आणि 22 या दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने अधिकृत पॅनल उभे केले. हे दोन्ही प्रभाग देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे आमदार अहिरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार देऊन युतीतील शिंदेसेनेला मोठा झटका दिला आहे. याच प्रभागातून आमदार अहिरे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या आणि माजी महापौर नयन घोलप यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे येथे राजकीय लढत चुरशीची होणार आहे.
भाजपचे धक्कातंत्र
एबी फॉर्म देताना भाजपने सर्वांत जास्त धक्कातंत्राचा वापर केल्याने भाजपच्या गोटात सर्वांत जास्त नाराजी पसरली. भाजपमधून सर्वांत जास्त बंडाळी होऊ शकते. भाजपने ऐनवेळी पंडित आवारे, अंबादास पगारे, मीरा हांडगे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. पंडित आवारे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. भाजपने यावेळी नवख्या उमेदवारांना संधी देण्याची चाल खेळली आहे. भाजपचे पदाधिकारी राजेश आढाव यांनाही भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीदेखील अखेरीस शिंदेसेनेतून उमेदवारी अर्ज भरला. दक्षिण भाजप जिल्हा विभाग अध्यक्ष संदीप शिरोळे यांनाही एबी फॉर्म पक्षाने नाकारल्याने त्यांच्या समर्थकांतून बंडाळीचे संकेत दिले आहेत. भाजपचे अंबादास पगारे आपला अर्ज सर्वसाधारण गटातून अपक्ष ठेवणार असल्याचे समजते. त्यामुळे ते आपलेच सहकारी संभाजी मोरुस्कर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत.
448 उमेदवारी अर्ज दाखल
नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांतील 24 जागांसाठी आतापर्यंत 448 उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयास प्राप्त झाले. प्रत्यक्षात 798 उमेदवारी अर्जांची विक्री झाली.
Many took the flag of another party after BJP rejected their candidature