मराठी भाषा दिन साजरा होताना…

दरवर्षी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी (दि. 27 फेब्रुुवारी) राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी देशभरात होत असल्याने देशात अनेक राज्ये निर्माण करण्यात आली. महाराष्ट्रातदेखील मराठी भाषिकांसाठी मराठी राज्य मिळावे, यासाठी 1946 पासून संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन होत होते. मोठ्या संघर्षानंतर अखेर 1 मे 1960 रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला आणि मराठी जनतेला मराठी राज्य मिळाले. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्राचा, मातृभाषेचा अभिमान आहे. मराठी भाषेचा मोठा इतिहास आहे. जवळपास नवव्या शतकापासून मराठी बोली बोलली जाते, अशी इतिहासात नोंद आहे.
यादवांच्या काळात मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर अधिक होऊ लागला. मराठी भाषेचा वापर राज्यातील सर्वधमीर्र्य, पंथ, जातीचे लोक वर्षानुवर्षे करीत आहेत. मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रसार, वापर व्हावा यासाठी आपण सर्वांंनीच सातत्याने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पारितोषिकाचे मानकरी कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही राजभाषा व्हावी, यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा, संस्कृती यासाठी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन 2013 पासून त्यांचा जन्म दिन 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्याचबरोबर दरवर्षी 1 मे राज्याच्या स्थापनादिनी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्नांना अखेर यश आले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. असा दर्जा मिळाल्याने प्राचीन ग्रंथाचे अनुवाद मराठीत भाषांतर, राज्यातील ग्रंथालयांचे सशक्तीकरण, देशातील सर्व विद्यापीठांत मराठी शिकण्याची सोय, केंद्राकडून आर्थिक मदत, मराठी भाषा उत्कर्षासाठी काम करणार्‍या संस्था, संघटना, व्यक्तींना आर्थिक पाठबळ मिळणे अधिक सुलभ होईल. मराठी मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी प्राथमिक, शालेय शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवे यासाठी शाळा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात खासगी विनाअनुदानित शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. गल्लोेगल्ली शाळा उघडल्यादेखील. मात्र, शिक्षणाचा मराठी भाषेचा प्रसार होण्याऐवजी शाळा या पैसा कमावण्याचा धंदाच बनला आणि मराठी शाळांऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले. सीबीएसई, ईसीएससी यांसारख्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेकडे पालकांचा, विद्यार्थ्यांचा कल वाढला. मराठी शाळांकडे मराठी माणसानेच पाठ फिरवली. केजीपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याची प्रवृत्ती मराठी माणसातच मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाने पुढील शिक्षणाचा पाया मजबूत होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक मराठी माणसांनी जगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अटकेपार झेंडे फडकविले आहेत. मराठी शाळा, शिक्षणाबाबत सर्वपक्षीय राज्यकर्त्यांची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीत म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आजच्या घडीला अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाषा, संस्कृती याचा अभिमान व अट्टहास कसा असतो, हे दक्षिण भारतीयांकडून शिकण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. मायबोली मराठीचा वापर करण्याबाबत आपणच उदासीनता दाखवतो. नाहक तोडक्यामोडक्या हिंदी, इंग्रजीत संवादाचा अट्टहास धरतो. मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा आजच्या व्यवहारी जगात यायल्याच हव्यात. त्याचा योग्य वापर करायलाच हवा. मात्र, तो महाराष्ट्रात राहून इतर ठिकाणी गेल्यावर. मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत आहेत. मुंबईतील 57 शाळा बंद होत आहेत. याला कारण म्हणजे घटती पटसंख्या. मग याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात 255 शाळा बंद पडल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने कमी पटसंख्येचे कारण देत 620 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. 2024 मध्ये सरकारने संचमान्यतेचा निर्णय घेत त्याद्वारे शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समायोजनेचा
निर्णय घेतला.
मराठी भाषेचा आग्रह हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम म्हणून साजरा होऊ नये. मुंबईत इतर भाषिकांचे आक्रमण झाले असूनदेखील मराठी माणूस आपल्या भाषेबाबत उदासीन आहे. मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्द्यावरून राजकारण होते. आंदोलने होतात. मात्र, त्याची फलनिष्पत्ती काय, हा प्रश्न उरतोच. मराठीतून दुकानांच्या पाट्या असा राज्यात कायदा आहे. मात्र, त्याचे पालन होत नाही. सगळ्यांनीच मराठीचा जास्तीत जास्त वापर करूया. मराठी बोलूया, मराठी जगूया, मराठी वागूया तर आणि तरच मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल राहील. त्यासाठी मराठी माणूस म्हणून आपल्याला मानसिकता आणि कार्यपद्धती बदलावी लागेल. आज मराठी भाषेतील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. मराठी मातृभाषेचा प्रसार आणि वापर वाढावा यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी. मराठी भाषेचा वापर करण्यास आपणच संकोच का मनी बाळगावा?
लाभले आम्हांस भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक
जाणतो मराठी
एवढ्या जगात माय
मानतो मराठी
– कवी सुरेश भट

Marathi Language Day is being celebrated…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *