नाशिक: प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी आज छावा संघटनेतर्फे येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हजारो कोटीच्या घोटाळ्यामधून निर्दोष मुक्तता होते,अदानी-अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केल्या जातात,पीक विम्याचे हजारो कोटींची रक्कम दुर्लक्षित केली जाते,मग सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हक्काचे कर्ज का माफ केले जात नाही?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे, याला आमचा तीव्र विरोध आहे. अजित पवार हे राज्याचे मालक नसून सेवक आहेत,त्यामुळे त्यांनी “मी बोललो नाही म्हणून कर्जमाफी करणार नाही” ही जी भूमिका घेतलेली आहे,त्या भूमिकेचा जाहीर निषेध करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी.
महाराष्ट्र राज्य कृषिप्रधान असून येथील लाखो शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे,अवकाळी पाऊस, दुष्काळ,गारपीट,महागडी शेतीसाधने आणि शासनाच्या निष्क्रिय धोरणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतमालाला हमीभाव नाही,विमा कंपनीचे लुबाडणारे धोरण सुरू आहे आणि महागाईने शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे. परिणामी,अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
आम्हाला समजत नाही की उद्योगपतींची कर्जमाफी शक्य आहे,तर शेतकऱ्यांची का नाही?
अजित पवार यांना हजारो कोटींच्या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता मिळते,मात्र कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला त्यांच्याकडे पैसा नाही? हे दुटप्पी धोरण आम्हाला मान्य नाही.
मागील काही वर्षांत आलेले पूर, अवकाळी पाऊस आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे, सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
मागण्या:
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, बँकांकडून शेतकऱ्यांवर होणारी जबरदस्ती थांबवावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शेतमालाच्या भावावर नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीच्या आधारे द्यावी. शेतकऱ्यांची थकीत वसुली पूर्णपणे थांबवून त्यांच्या नावे असलेले खाते एनपीए होणार नाही,याची हमी द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी नेहमीच संवेदनशील राहिले आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले आहेत.त्यामुळे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा,अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जर शासनाने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही,तर संपूर्ण राज्यभर अशाच प्रकारचे बैलगाडी मोर्चे काढण्यात येतील आणि शेवटचा निर्णायक मोर्चा मुंबई मंत्रालयावर नेण्यात येईल.
अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही,असे वक्तव्य केले आहे.त्यामुळेच आम्हाला आज रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे.जर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर केली नाही,तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील.
या मोर्चामध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,शिवाजी मोरे,शिवा तेलंग,नवनाथ शिंदे,डॉ.किरण डोके,आशिष हिरे,नवनाथ वैराळ,अविनाश शिंदे,प्रवीण पाटील,वैभव दळवी,दिनेश जाधव,विठ्ठल भुजाडे,आबा पाटील,गोरख संत,प्रफुल गायकवाड,ज्ञानेश्वर पालखेडे, रोहिदास पवार,विजय मोरे,राहुल काकळीज,निलेश शेजुळ,किरण बोरसे,अमोल शिंदे,प्रिया वरपे, संदीप पवार,सोपान लांडगे,वैभव भड,दीपक सहांनखोरे,सागर पठारे,नवनाथ जगताप,प्रवीण झिंजाळ,संतोष जेजुरकर,गोविंद शिंदे,विवेक चव्हाण,गोरख सांबरे,गोरख कोटमे,रोहित झाल्टे,तुषार झाल्टे,जालिंदर मेंडकर,अनिल मलदोडे,सुशांत कुडदे,नितीन अनारसे,वैभव गांगुर्डे,अमोल देवरे,दत्ता महाराज पवार,अशोक जाधव,संजय पवार,निमदेव हिरे,अजिंक्य वाकचौरे,रोशन जाधव आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.