लगीन की मतदान? नागरिकांची दुहेरी परीक्षा

लोकशाही मजबूत करायची असेल तर लग्नाआधी मतदान आवश्यकच!

निफाड : विशेष प्रतिनिधी
ओझर, पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आज, दि. 2 डिसेंबरला मतदान होत आहे. मात्र, याच दिवशी हंगामातील मोठी विवाहाची तिथी असल्याने अनेक कुटुंबे विवाह सोहळ्यांच्या तयारीत गुंतलेली आहेत. त्यामुळे मतदार मतदान केंद्राकडे वळणार की विवाह सोहळ्याकडे, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव म्हणजे मतदान. नागरिकांनी आधी मतदान मग लगीन उमेदवाराचे आणि ‘तुमचे एक मत बदलू शकते भविष्य’ या संदेशांसह सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज, 2 डिसेंबर ही तारीख एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी ठरणार आहे. तालुका प्रशासनाने विवाह आयोजन समित्या, फोटोग्राफर्स, हॉल संचालक, तसेच सामाजिक संस्थांना विशेष आवाहन करून, लग्नपत्रिकांवर ‘आधी मतदान करा,’ अशा सूचना द्याव्यात, समारंभांदरम्यान घोषणा करून पाहुण्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती मतदान टाळल्यास उमेदवार निवड व लोकशाहीच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अनेक नागरिकांनी ‘प्रथम मतदान, नंतर लगीन’ असा निर्धार सोशल मीडियावर जाहीर केला आहे. स्थानिक विवाह व्यावसायिक, हॉल संचालक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, आज 2 डिसेंबर हा हंगामातील सर्वाधिक मागणी असलेला शुभ दिवस आहे. अनेक कुटुंबे बाहेरील गावी विवाहासाठी जात असल्याने पाहुण्यांची ये-जा, लग्नव्यवस्था आणि समारंभातील धांदल यामुळे मतदानासाठी वेळ काढणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. परिणामी मतदानाचा टक्का कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासन मात्र ठामपणे आवाहन करत आहे, लोकशाही मजबूत करायची असेल, तर लग्नाआधी मतदान आवश्यकच!

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक एक मत महत्त्वाचे आहे. सर्व जागरूक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा.
– डॉ. आप्पासाहेब शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *