दोन हजार हजार बालकांना गोवर रुबेलाची लस

 

 

 

मोहीमेचा दुसरा टप्पा15 जानेवारीपासून

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

 

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशीत केल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडून (दि.१५) जानेवारीपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. ही मोहीम २५ जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. शहरात विशेष वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण २ हजार ३३८ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य सेविका यांच्या मार्फत ‘एमआर 1’ चा डोस १ हजार १३५ तर ‘एमआर 2’ चा डोस १ हजार २०३ बालकांना देण्यात आला आहे.

 

 

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडत आहे. १५ जानेवारी ते २५ जानेवारी या दुस-या टप्प्यातील कालावधीत नाशिक शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका,  अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. ९ महिने ते ५ वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे. या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशीही सूचना देण्यात आली आहे. लसीकरणाच्या सर्व्हेक्षणाला येणाऱ्या कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *