नाशिक : प्रतिनिधी
गोवरचा मुंबई आणि मालेगाव येथे बालके बाधित होत असल्याने नाशिक महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, मुंबई येथील हाफ्कीन लॅबमध्ये राज्यातील नमुने येत असल्याने मोठा ताण लॅबवर येत आहे. त्यामुळे आता येथून पुढे नाशिकमधील संशयित बालकांचे नमुने अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. आतापर्यंत नाशिक शहरात २७९ गोवर संशयितांचे नमुने तपासणीसाठी हाफकिनला पाठविण्यात आले होते. त्यापैकी २५२ अहवाल निगेटिव्ह आले. तर १८ अहवालांचा रिझल्ट प्रलंबित आहे. गोवर, पोलिओ व इतर साथीचे रोग निर्मूलनासाठी शासन व डब्ल्यूएचओ ही संस्था सोबत काम करतो. डब्ल्यूएचओ संस्थेच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने संशयितांचे नमुने अहमदाबादला पाठविण्याचा निर्णय घेतला. नमुने कुरिअरने पाठवले जाणार असून, त्याचा खर्च डब्ल्यूएचओ करणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील गोवर संशयितांचे नमुने अहमदाबादला पाठविले जाणार आहे. तसेच चार ते पाच दिवसांत हे नमुने पालिकेला मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गोवर संशयितांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील हाफकीन ही एकमेव प्रयोगशाळा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी तपासणीसाठी नमुने पाठवले जात आहे. त्यामुळे येथील मनुष्यबळ व संसाधनाची उपलब्धता पाहता नमुने तपासणीचा लोड वाढला असून, रिझल्ट प्राप्त होण्यासाठी वेळ लागत आहे. हा भार कमी करण्यासाठी नाशिक, धुळे, नगर, जळगाव व नंदुरबार येथील गोवर संशयितांचे नमुने यापुढे अहमदाबाद येथे पाठवले जाणार आहे. येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील नॅशनल पोलिओ प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. देशभरातून देखील या ठिकाणी नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याने रिझल्ट एक ते दोन दिवस उशीराने प्राप्त होण्याची शक्यता आहे.