इच्छुक उमेदवारांचा हिरमोड; मोबाइलवरील स्टेटसही गायब
दिंडोरी ः प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सारख्या पुढे ढकलत असल्यामुळे निवडणूक लांबणीवर जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होताना दिसत आहे, तसेच काही उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या गटातील गावांमध्ये वाढदिवस, लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा अनेक कार्यक्रमांना इच्छुक उमेदवारांकडून न चुकता हजेरी लावली जात होती.
तसेच स्वतःच्या व हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते यांच्या मोबाइलवर व गटातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे स्टेटस व रील ठेवले जात होते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण ज्या विभागात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथील निवडणुकीवर काही ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची सुनावणी 21 जानेवारीला ठेवल्याने इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बांधलेले बाशिंग उतरविण्याची वेळ आली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटामध्ये गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या होत्या; परंतु ही निवडणूक लांबणीवर जात असल्याने भेटीगाठी करताना दिसत नाही, तसेच आपल्या
स्वतःच्या व कार्यकर्ते, समर्थक यांच्या मोबाइलवरही निवडणुकीसंदर्भात स्टेटस व रील दिसत नाहीत. याचाच अर्थ इच्छुक उमेदवारांची निराशा मावळली की काय, असे चित्र बघायला मिळत आहे. त्यातही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे, त्या ठिकाणी आरक्षण बदल करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची धडकी अजूनच वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मी माझ्या गटातील गावांमधील कार्यकर्ते, समर्थक तसेच स्थानिक प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, गावांतील नेतेमंडळी यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. निवडणूक पुन्हा लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे, तसेच ज्या विभागात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असेल, तेथे बदल करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची धडकी भरली आहे.
-सोमनाथ वतार, इच्छुक उमेदवार, मोहाडी गट